- आशिष गावंडे
अकोला : एकीकडे एलईडीच्या लखलखाटात शहर न्हाऊन निघत असतानाच दुसरीकडे वीज बचतीच्या मूळ उद्देशाला खुद्द महापालिका प्रशासनाकडूनच बाजूला सारल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शहरात अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा प्रताप ‘ईईएसएल’कंपनीकडून होत असताना ही अनावश्यक उधळपट्टी कशासाठी, असा सवाल सुज्ञ अकोलेकर विचारू लागले आहेत. भरमसाट वीज देयकाच्या माध्यमातून हा प्रकार भविष्यात प्रशासनाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची नियुक्ती केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला आहे. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यापासून मिळणारा उजेड, त्यावर खर्च होणारी वीज व त्या बदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करारनामा मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांना घाई होती. त्यानुषंगाने ६ मार्च रोजी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजय कापडणीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी करारनाम्यावर स्वाक्षºया केल्या. त्यानंतर शहराच्या विविध भागात कंपनीच्यावतीने एलईडी लाइट उभारण्याचे काम सुरू झाले. वीज बचतीच्या अनुषंगाने कमी वॅटच्या बदल्यात जास्त उजेड देण्यासाठी एलईडी लाइटची ख्याती असल्याने मनपाच्या वाढीव वीज देयकात नक्कीच घसरण होईल,अशी अपेक्षा होती. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार पाहावयास मिळत आहे. अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर चक्क तीन-तीन एलईडी लाइट उभारण्याचा सपाटा कंपनीने लावला आहे. गरज नसताना अनावश्यक वीज लाइट उभारल्या जात असल्याने सुज्ञ अकोलेकर मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.‘ईईएसएल’सोबत १९ कोटींचा करारमनपाने ‘ईईएसएल’ कंपनीसोबत १९ कोटी ९० लक्ष रुपयांचा करार केला आहे. यामध्ये लाइट उभारणीसाठी १३ कोटी ९० लक्ष रुपये व देखभाल दुरुस्तीपोटी ६ कोटी रुपये चौदाव्या वित्त आयोगातून अदा केले जातील. एकूणच, आजरोजी शहरात ४० कोटींतून एलईडी लाइट उभारणीचे काम होत असताना अनावश्यक ठिकाणी लाइट लावल्या जात असल्याने सत्तापक्षासह प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.२० कोटींची कामे अंतिम टप्प्यातशहरात रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश असून, पथदिवे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी राज्य शासनाकडून १० कोटी रुपये व मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद केली होती.