अकाेला : शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्य अकाेलेकरांच्या नाकीनऊ आले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे शहरातील काही खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भटक्या श्वानांची मोफत नसबंदी करण्याचा प्रस्ताव सादर केला असता, त्याला आयुक्त निमा अरोरा यांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे. स्थानिक सुभाष चौकातील कोंडवाडा विभागाच्या जागेवर भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे.
शहरातील गल्लीबोळांत मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्री- अपरात्री घरी परतणाऱ्या वाहनचालकांच्या मागे मोकाट कुत्रे धावतात. यातून अनेकदा वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी ओरड केल्यानंतर कोंडवाडा विभागाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराच्या वतीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम काही दिवस राबविली जाते. त्यानंतर आपोआप ही मोहीम बंद केली जाते.
यावर मनपा प्रशासनाने प्रभावी तोडगा काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
तत्कालीन आयुक्तांनी सुरू केली नसबंदी
शहरात भटक्या श्वानांचा उद्रेक लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सर्वप्रथम भटक्या श्वानांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मागील पाच वर्षांच्या कालावधीत ७०० पेक्षा अधिक कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. आजपर्यंत यावर सहा लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.
नसबंदीसाठी १,२०० रुपये
शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी प्रशासनाने गोमाशे नामक खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली, तसेच नसबंदीसाठी पशू व मस्त्यविज्ञान स्नातकाेत्तर संस्थेची नियुक्ती केली. मागील चार वर्षांच्या कालावधीत विज्ञान संस्थेने ७०० पेक्षा अधिक कुत्र्यांची नसबंदी केली आहे. या बदल्यात संस्थेला प्रती कुत्रा १,२०० रुपये यानुसार आजपर्यंत सहा लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.
मोफत नसबंदीसाठी पुढाकार
मनपाच्या कोंडवाडा विभागाने ताब्यात घेतलेले कुत्रे जिल्ह्यातील जंगल परिसरात सोडले जातात. यामुळे वनपरिक्षेत्रात लगतच्या गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिवाय काही दिवसांनंतर असे मोकाटे श्वान शहरात परत येत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी शहरातील काही खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोफत नसबंदीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
कुत्रे पकडण्यासाठी चार कर्मचारी
काेराेनामुळे मागील काही महिन्यांपासून भटके कुत्रे पकडण्याची माेहीम बंद हाेती. मनपाने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारासहित चार कर्मचारी कुत्रे पकडतात. शहरात कुत्र्यांची वाढलेली संख्या पाहता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.