शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्याने येथील बसस्थानकात मोठी वर्दळ असते. येथील स्थानकावर लांब पल्ल्याच्या बसेसनाही थांबा आहे; परंतु या स्थानकात खासगी वाहने उभी राहत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. दररोज बसस्थानक आवारात १५ ते २० खासगी वाहने उभी राहतात. या बाबीकडे स्थानक व्यवस्थापक यांचे लक्ष नसल्याने दररोज वाहनांची संख्या वाढत आहे. या खासगी वाहनांमुळे स्थानकात येणाऱ्या एसटी बसेस आणि प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. एखाद्यावेळी अनावधानाने खासगी वाहनास धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा खासगी वाहनचालक आणि एसटीचालकांमध्ये वाददेखील झाले आहेत. अधिकारी लक्ष देत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
बसेसचे सॅनिटायझेशन आवश्यक
सध्या कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार महामंडळाने मूर्तिजापूर आगारातून सुटणाऱ्या बसेसचेही सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे. मात्र येथील आगारातील बसेस विनासॅनिटाईज व स्वच्छता न करताच मार्गावर पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
सॅनिटाईज केल्याशिवाय कुठलीही बस सोडली जात नाही. फेरी सोडताना बस पूर्णपणे सॅनिटाइज केली जाते. स्थानकात अनधिकृत वाहने गोळा होऊन उभी केली जातात, याबाबत पोलिसांना २०० मीटर परिसरात अशी वाहने उभी होऊ नये, असे पत्र दिले आहे.
- प्रवीण आंबुलकर, आगार व्यवस्थापक, मूर्तिजापूर