मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:51 AM2020-09-13T10:51:22+5:302020-09-13T10:51:39+5:30

राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

'My Family-My Responsibility' Campaign to Reduce Mortality! | मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम!

मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम!

Next

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्याकरिता आता राज्यभरात ‘माझे कुटुंब-माझी जबाबादारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची जनतेच्या सहभागातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील कोविड-१९ रुग्णालयांमध्ये होणाºया रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यानुषंगाने यापुढे कोरोना विषाणूचा संसर्ग आणि मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी जनतेच्या सहभातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ‘माझे कुटुंब-माझी जबाबादारी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ही मोहीम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना ११ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाºया ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे, वस्त्या व तांडे यातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना उपचार आणि प्रत्येक नागरिकास भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. मोहिमेच्या कालावधीत गृहभेटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आरोग्य पथकांची संख्या निश्चित करण्यात आली असून, एका पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक सरपंच, नगरसेवकांनी निश्चित केलेले दोन स्वयंसेवक असणार आहेत. पथकातील या सदस्यांना ‘कोरोना दूत’ असे संबोधण्यात येणार आहे. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देणार असून, त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच दुर्धर आजाराच्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. ताप, खोकला, दम लागणे इत्यादी कोरोनासदृश लक्षणे असणाºया व्यक्तींना जवळच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका इत्यादी यंत्रणांमार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

Web Title: 'My Family-My Responsibility' Campaign to Reduce Mortality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.