अतुल जयस्वाल, अकोला: आगामी काळात उन्हाळ्यातील सुट्या व लग्नसराईच्या हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर या महत्वाच्या मार्गावर शनिवार, १३ एप्रिलपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या या गाडीला अकोला रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०११६५ नागपूर-पुणे विशेष एक्स्प्रेस १३ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दर सोमवार व शनिवारी नागपूर येथून १९:४० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. तर ०११६६ पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस १४ एप्रिल ते १६ जून या कालावधीत दर मंगळवार व रविवारी पुणे येथून १५:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६:३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीच्या अप व डाऊन प्रत्येकी १९ अशा एकूण ३८ फेऱ्या होणार आहेत. या गाडीला २ वातानुकूलित-द्वितीय , १० वातानुकूलित-तृतीय, १ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ जनरल सेकंड क्लास डबे असणार आहेत.
या ठिकाणी थांबाया गाडीला अप व डाऊन मार्गावर वर्धा, धामणगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावल, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौड़ कॉर्ड लाइन आणि उरळी या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.