अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवार व रविवारी अकाेल्यात दाखल हाेत असून, विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गांवडे यांनी दिली
जयंत पाटील हे विदर्भाच्या दाैऱ्यावर असून, यादरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ते पक्षाचा आढावा घेत आहेत. साेबतच जलसंपदा विभागाच्या कामांबाबतही अडचणी आणि प्रगतीची माहिती घेत आहेत, अकाेल्यातील दाैऱ्यात त्यांच्यासमवेत गृहमंत्री अनिल देशमुख तसेच औषध व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे तसेच युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्फे, विदर्भ संघटक प्रवीण कुंटे-पाटील आदी नेते उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी ५ वाजता कारंजाहून मूर्तीजापूर येथे ना. पाटील यांचे आगमन होईल. सायंकाळी मूर्तीजापूर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक होईल. त्यानंतर अकोटकडे प्रयाण करून रात्री अकोट विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडेल. त्यानंतर रात्री अकोला येथे मुक्काम करणार आहेत. दुसऱ्यादिवशी अकोला शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक, अकोला पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर बाळापूरकडे रवाना हाेतील. या बैठकांना जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीला उपस्थित रहावे. तसेच कार्यकारिणीमधील पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केले आहे.