राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज - ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:37 AM2017-12-27T01:37:11+5:302017-12-27T01:40:08+5:30
आमच्या वेळेस राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात होते. आता ते अमरावतीला गेले. ते कसे परत येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव (मामा) यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एकेकाळी कलावंत निष्ठावंत होते. निष्ठेने नाटकं बसविली जात. आता अकोल्यात सांस्कृतिक नाट्यगृह उभे होत आहे. त्यामुळे नाटक आणि कलावंतांना चांगला वाव आहे. आमच्या वेळेस राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात होते. आता ते अमरावतीला गेले. ते कसे परत येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव (मामा) यांनी येथे केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू झालेल्या ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेश थोरात, ज्येष्ठ नाट्यकर्मी व परीक्षक अरुण घाटोळे, श्रीकांत भाके, विकास फटिंगे, पत्रकार श्रीकांत जोगळेकर, अकोला विभागाचे सहायक कल्याण आयुक्त रामेश्वर अळणे आदी होते.
ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव म्हणाले, तरुणाईने नाट्यशास्त्र समजून घ्यावे, त्याशिवाय नाटकं करता येत नाहीत. दर्जेदार नाटकं बसविली गेली, तर रसिक वर्गही जोडला जातो. त्यामुळे युवक, युवतींनी नाटकांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून नाट्य स्पर्धेचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त रामेश्वर अळणे यांनी केले. अळणे यांनी नाट्यकर्मी कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचा मंच मिळावा, या दृष्टिकोनातून ६५ वर्षांपासून नाट्य महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. रंगमंचावर कामकार कल्याण केंद्र शिवणीतर्फे तांडा (ऊसतोडीचा) नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. २५ डिसेंबर ते २३ जानेवारीपर्यंत नाट्य महोत्सव होणार असून, ही नाट्य रसिकांना एक मेजवानीच आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक केंद्र संचालक कारंजाचे प्रमोद घोडचर यांनी केले.
आभार कल्याण निरीक्षक भास्कर भेले यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधू जाधव, अशोक ढेरे, सुधाकर गीते व डॉ. अशोक ओळंबे प्रामुख्याने उपस्थित होते.