यावेळी मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी जबाबदारी स्वीकारून बुथ कमिट्या तयार कराव्यात व स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी. असे आवाहन त्यांनी केले. तसेच तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच त्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यात्रेमागची भूमिका विशद केली. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, रविकांत वरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, भैय्यासाहेब तिडके, बळीराम सिरसकार, हरिदास भदे, रवी राठी, संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रक्षणा सलगर, गुलाबराव गावंडे, प्रदेश प्रवक्ता आशा मिरगे, शिवा मोहोड, उज्ज्वला राऊत, सुषमा कावरे उपस्थित होते.
फोटो:
सायंकाळचा कार्यक्रम रात्री
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता नियोजित होता, परंतु कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरु झाल्याने उपस्थितांसह बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यांना अनेक तास ताटकळत काढावे लागले.
कुरघोडी, गटबाजी अन् नाराजी
परिवार संवाद दौऱ्यानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये उघड गटबाजी व नाराजी दिसून आली. माजी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीधर कांबे यांनी जिल्हा नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त करुन शिवा मोहोड यांच्यावर टीका केली. जिल्ह्यातील युवक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून जिल्हाध्यक्ष मनमानी करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शहर अध्यक्ष राम कोरडे आणि प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांच्यातही मतभेद असल्याचे उघड झाले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडून का आला नाही, यावर रवी राठी यांनी विश्लेषण करताना तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलल्याचे सांगताच, अध्यक्ष राम कोरडे यांनी आक्रमक होऊन आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना जयंत पाटील यांनी शांत बसण्याचा सल्ला दिला.