गतवर्षीच्या तुलनेत नीटचा पेपर सोपा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:51 PM2019-05-06T12:51:30+5:302019-05-06T13:03:28+5:30
अकोला: दरवर्षी एनईईटी(नीट) परीक्षेचा पेपर हा कठीण निघत असतो; परंतु यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेला नीटचा पेपर अत्यंत सोपा असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया रविवारी परीक्षा केंद्रांवर ऐकायला मिळाल्या.
अकोला: दरवर्षी एनईईटी(नीट) परीक्षेचा पेपर हा कठीण निघत असतो; परंतु यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेला नीटचा पेपर अत्यंत सोपा असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया रविवारी परीक्षा केंद्रांवर ऐकायला मिळाल्या. पेपर सोपा निघाल्यामुळे यंदा ‘कट आॅफ’ वाढण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अकोल्याला नीट परीक्षेचे प्रथमच परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. रविवारी शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर आठ हजारांवर विद्यार्थ्यांनी पेपर दिला.
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षा घेण्यात येते. वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची समजली जाणारी एनईईटी (नीट) परीक्षा ५ मे रविवारी शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर प्रथमच पार पडली. वैद्यकीय परीक्षेसाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा काठिण्य पातळीची समजली आहे. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात. यंदाही नीटचा पेपर कठीण येईल, अशी अपेक्षा होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेने यंदा नीटचा पेपर सोपा असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भौतिकशास्त्र विषयाशी संबंधित बरेच प्रश्न हे कठीण असतात; परंतु यंदा मूलभूत संकल्पनेवर आधारित भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न पेपरमध्ये होते. नीट परीक्षेत जीवशास्त्र विषयावर ९0 प्रश्न, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयावर प्रत्येकी ४५ प्रश्न विचारण्यात आले. यंदा पेपर सोपा असल्याने, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. त्यामुळे यंदा वैद्यकीय प्रवेशाचा ‘कट आॅफ’ वाढण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनीही लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी!
नीटचा अत्यंत महत्त्वाचा पेपर असल्यामुळे शहरातील व बाहेरगावचे पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी रविवारी सकाळी ११ वाजतापासूनच परीक्षा केंद्रांवर हजर होते. शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांची कसून तपासणी
सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना कोणतीही वस्तु अथवा शैक्षणिक साहित्य परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई करण्यात आली होती. एनटीए मार्फतच विद्यार्थ्यांना बॉलपेन पुरविण्यात आले होते.
गतवर्षीपेक्षा यंदा नीटचा पेपर अत्यंत सोपा होता. त्यामुळे पेपरदरम्यान कोणतीही अडचण गेली नाही. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. वेळेतच पेपर मिळाला.
-पूजा ठाकरे, विद्यार्थिनी.
पेपर कठीण आला तर काय होईल, अशी मनात भीती होती; परंतु पेपर सोपा आला. भौतिकशास्त्र विषयावरील प्रश्नही सोपे होते. त्यामुळे येणारा निकाल निश्चितच चांगला लागेल.
-भक्ती पाटील, विद्यार्थिनी.
नीटच्या पेपरबाबत मनात भीती होती की पेपर कसा निघेल; परंतु पेपर हाती आल्यावर सोपा असल्याचे दिसून आले.
-गौरव अघडते, विद्यार्थिनी.