डिजिटल शाळांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष; मोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:00 AM2017-11-22T00:00:45+5:302017-11-22T00:05:35+5:30
अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे.
बबन इंगळे
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड : अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उदात्त हेतूने जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवात धडाक्याने झाल्यानंतर ही मोहीम थंडावल्याचे बाश्रीटाकळी तालुक्यात चित्र आहे. शिक्षकही अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करीत नसल्याचे चित्र आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि सीईओ एम. देवेंद्रसिंग यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात डिजिटल शाळा मोहीम सुरू करण्यात आली. लोकसहभागा तून सुरू झालेल्या मोहिमेंतर्गत सुरुवातीलाच ५५ शाळा डिजिटल करण्यात आल्या. त्यानंतर दुसर्या सत्रात ही मोहीम थंडावली आहे. तालुक्यात एकूण १३६ शाळा आहेत. त्यापैकी ८१ शाळा अजूनही डिजिटल झाल्या नसल्याचे चित्र आहे. मे २0१७ पासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली व त्यानंतर विविध वेबसाइटवर शिक्षकांना माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळा डिजिटल करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. ज्या शाळा डिजिटल झाल्या, त्या पैकी अनेक शाळांमधील साहित्य धूळ खात पडलेले आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये वीज नाही, असली तरी भारनियमनामुळे डिजिटलचे साहित्य उपयोगा तच आणता येत नसल्याचे चित्र आहे. खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि जिल्हा परिषदेतील शाळांतील शिक्षकांच्या बदल्या यामुळे डिजिटल शाळा मोहीम बासनात गुंडाळल्याचे चित्र आहे.
इंग्रजी माध्यमाचे महागडे शिक्षण शुल्क भरून प्रवेश मिळणार्या शाळेप्रमाणे जि. प.च्या प्राथमिक शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्याची चळवळ उभी केली; परंतु सध्या ही चळवळ बंद पडल्याने ग्रामीण भागातील बहुतांश जि. प.च्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालल्याचे दिसून येत आहे. ही चळवळ नव्या उमेदीने गतिमान करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, याकरिता जनजागृती, लोकसहभागाकरिता प्रवृत्त करणे, याचे महत्त्व प्रसाराद्वारे व्हावे, तरच या उपक्रमास गती येईल.
अध्यापन विस्कळीत
शासनाचे विविध आदेश येत असल्याने तालुक्यातील अनेक शाळांमधील अध्यापन विस्कळीत झाले आहे. शिक्षकांचा बहुतांश वेळ शासनाने सुरू केलेल्या विविध वेबसाइटवर भरण्यातच जात असल्याने त्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातही समायोजन आणि बदली प्रक्रियेमुळे अनेक शाळांमध्ये अध्यापन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
जि.प.च्या प्राथमिक शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभाग व प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. शाळा स्तरावरील गावातील लोकसहभागाअभावी या उपक्रमाला प्रतिसाद मिळत नसल्याची कारणे समोर आली आहेत. तरीही ग्रामपातळीवर याबाबत शिक्षण विभागाच्या माध्यमातून जनगृतीची मोहीम राबविण्याचा प्रयत्न करू.
- मीनल भेंडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स. बाश्रीटाकळी.