लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मुलगी झाली, लक्ष्मी झाली’ असे नेहमीच म्हटल्या जाते. याच लक्ष्मीचे दिवाळीला पूजनही केले जाते; पण याच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दोन दिवसीय चिमुकली रस्त्याच्या कडेला बेवारस आढळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दक्षतानगर पोलीस लाइन परिसरात घडला. ही चिमुकली कचऱ्यामधील एका पिशवीत असल्याचे येथील काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांना दिली असून, पोलीस तपास घेत आहेत.दक्षता नगरातील पोलीस लाइन परिसरात कचºयामध्ये सोमवारी सकाळपासूनच एक पिशवी संशयास्पद पडून होती. या पिशवीला काही कुत्रे ओढत असल्याचे नरेश राऊत नामक युवकाच्या निदर्शनास आले. नरेश राऊत हे येथून जवळच असलेल्या ख्रिश्चन कॉलनीतील रहिवासी असून, सकाळपासूनच त्या पिशवीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष जात होते; पण त्याकडे सर्वजण दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. कुत्र्याने पिशवी ओढल्याने त्यामध्ये नवजात बाळ असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या धक्कादायक प्रकारानंतर नरेश राऊत यांनी त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने त्या बेवारस चिमुकलीला रुग्णसेवक आशिष सावळे यांच्या मदतीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या धक्कादायक प्रकाराची माहिती त्यांनी खदान पोलिसांना दिली. माहिती मिळताच खदान पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी चौकशी करत नरेश राऊत यांनी सांगितल्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन दिवसांच्या बेवारस चिमुकलीवर बालरुग्ण विभागात उपचार सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. चिमुकलीला वाचविण्यासाठी नरेश राऊत यांना विजय नावकार, दादु गवई, अनुप सुरवाडे, मोनु मानकर आणि प्रदीप ठाकूर यांनी सहकार्य केले. चिमुकलीला लागल्या होत्या मुंग्या कचºयामध्ये बेवारस पिशवीमध्ये आढळलेल्या दोन दिवसांच्या मुलीला त्या युवकांनी उचलले, त्यावेळी तिच्या अंगावर मुंग्या असल्याचे आढळून आले. त्या युवकांनी मुलीच्या अंगावरील मुंग्या काढून मुलीला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.आॅक्टोबर महिन्यातील दुसरी घटना याच महिन्यात २ आॅक्टोबर रोजी सर्वोपचार रुग्णालयात एक बेवारस चिमुकली आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या मुलीला दोन महिलांनी बेवारस सोडल्याची घटना सीसी कॅमेºयात कैद झाली होती. या घटनेला महिना होत नाही, तोच आणखी एक चिमुकली रस्त्याच्या कडेला कचºयामध्ये आढळून आली.
दोन दिवसाची चिमुकली रस्त्यावर बेवारस आढळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:06 AM