आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शिवसेनेची तटबंदी मजबूत करण्यासाठी पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत व त्यांची फळी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. शिवसेना व इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सेनेचे महिला संघटन खिळखिळे झाल्याचे चित्र आहे. महिला आघाडीच्या बैठकीत बोटावर मोज ता येणार्या महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर खा. अरविंद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत नवीन चेहर्याचा शोध घेण्याचे निर्देश स्थानिक पदाधिकार्यांनी दिल्याची माहिती आहे. कधीकाळी जिल्ह्यातील बोरगाव मंजू, रिसोड, अकोट विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व गाजविणार्या शिवसेनेची पीछेहाट झाल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा दरारा निर्माण करणारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे व स्थानिक पदाधिकार्यांमधील अंतर्गत वादावर पडदा न टाकता त्याला खत पाणी घालण्याचे काम तत्कालीन पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुखांनी इमानइतबारे बजावले. त्यामुळे शिवसेनेची मजबूत तटबंदी कधी ढासळली, हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षातही आले नाही. खा. अरविंद सावंत यांच्याकडे पश्चिम विदर्भाच्या संपर्कप्रमुख पदाची धुरा येई पर्यंत बराच उशीर झाला होता. मागील १३ वर्षांच्या कालावधीत सेनेच्या पदाधिकार्यांनी जि.प. सर्कल प्रमुख, पंचायत समिती सर्कल प्रमुख, बुथ प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांच्या माध्यमातून पक्षाची कितपत बांधणी केली, हा संशोधनाचा विषय आहे. परिणामी पक्ष रसातळाला गेला. खा. अरविंद सावंत यांनी पक्षाची धुरा सांभाळताच जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नव्या दमाच्या शिवसैनिकांना एकत्र करून पक्ष संघटना वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून पक्षाने राजकीय धुराळा उठविल्याचे चित्र आहे. साहजिकच, जिल्हा कार्यकारिणी पक्ष वाढीसाठी मेहनत घेत असताना त्या तुलनेत सेनेची महिला संघटना कमालीची खिळखिळी झाल्याचे चित्र दिसून येते. बोटावर मोजता येणार्या महिला पदाधिकार्यांच्या पलीकडे सक्षम, उत्साही महिलांचा फौजफाटा तयार नसल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांच्या बैठकीत उघडकीस आला. रविवारी (५ नोव्हेंबर) महिला आघाडीच्या बैठकीत उपस्थित महिला कार्यकर्त्यांची संख्या पाहता खा. सावंत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच आघाडीच्या बांधणीसाठी नव्या चेहर्याचा शोध घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
संघटनेची पुनर्बांधणी का नाही?स्वत: पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचे नाहीत. त्यासाठी नवीन कार्यकर्ता तयार होऊ द्यायचा नाही, असे धोरण स्वीकारणार्या महिला पदाधिकार्यांनी आघाडीची पुनर्बांधणी का केली नाही, असा सवाल उपस्थित होतो. आगामी जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे महिला कार्यकर्त्या उपलब्ध नसल्याने घरोघरी मतांचा जोगवा मागताना पक्षाला अडचणींचा सामना करावा लागेल, असे दिसून येते.
नवीन चेहर्यांना प्राधान्य!महिला आघाडीची झालेली वाताहत पाहून शिवसेना नेते खा. अरविंद सावंत प्रचंड नाराज आहेत. पक्षवाढीसाठी महिला पदाधिकार्यांनी संधीचे सोने न केल्यामुळे नवीन चेहर्यांनाच प्राधान्य देण्यावर पक्षात काथ्याकूट सुरु झाल्याची माहिती आहे. यामुळे समाजकारणासाठी धडपडणार्या महिलांसाठी ही सुवर्णसंधीच मानली जात आहे.