अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ आॅगस्ट रोजी लॉकडाऊन संदर्भात आदेश काढताना १ ते ३० सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे; मात्र अकोल्यातील कोणत्याही कोपºयात या संचारबंदीच्या अंमलबजावणीचे चित्र नाही. पोलिसांच्या कारवाईचाही धाक संपला असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत रस्त्यावरची गर्दी कायम असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने टिपले आहे.‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अट तसेच रविवारचे लॉकडाऊनही रद्द करण्यात आले आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि किमान संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत संचारबंदीचे पालन करून संसर्ग टाळणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. अकोल्यातील सिंधी कॅम्प मार्गावर तर संध्याकाळी सातनंतर दुकानेही सुरू असतात अन् नागरिकांची वर्दळही रात्री १२ पर्यंत असते. जठारपेठ, टॉवर चौक, गांधी रोड, तुकाराम चौक, इन्कमटॅक्स चौक, जुने शहर अशा महत्त्वाच्या चौकातही रात्री वर्दळ असते. कलम १४४ च्या कारवाईचा धाकही संपला!कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचा आदेश काढलेला आहे. गेल्या १० दिवसात या आदेशाचे उल्लंघन झाले म्हणून एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.
रात्रीची संचारबंदी फक्त कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:45 AM