‘निगरुणा’चे पाणी पारस वीज केंद्रासाठी; ५३ किलोमीटर प्रवास करून पोहोचणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:51 AM2018-01-23T01:51:04+5:302018-01-23T01:51:28+5:30
वाडेगाव : पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एक युनिट पाण्याअभावी बंद पडले आहे. हे युनिट पुन्हा सुरू करण्यासाठी पातूर तालुक्यातील चोंढी गावात असलेल्या निगरुणा प्रकल्पाच्या आरक्षित पाण्यातून एकूण १.५0 दलघमी पाणी १८ जानेवारीपासून कॅनॉलच्या माध्यमातून सोडण्यात आले. सोमवारी वाडेगावपर्यंत हे पाणी पोहोचले होते. ५३ किलोमीटरचा प्रवास करीत बाळापूूर येथील बंधार्यात जमा होण्यासाठी या पाण्याला १५ ते २0 दिवस लागतील, असे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे.
राहुल सोनोने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडेगाव : पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एक युनिट पाण्याअभावी बंद पडले आहे. हे युनिट पुन्हा सुरू करण्यासाठी पातूर तालुक्यातील चोंढी गावात असलेल्या निगरुणा प्रकल्पाच्या आरक्षित पाण्यातून एकूण १.५0 दलघमी पाणी १८ जानेवारीपासून कॅनॉलच्या माध्यमातून सोडण्यात आले. सोमवारी वाडेगावपर्यंत हे पाणी पोहोचले होते. ५३ किलोमीटरचा प्रवास करीत बाळापूूर येथील बंधार्यात जमा होण्यासाठी या पाण्याला १५ ते २0 दिवस लागतील, असे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे.
मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने मन नदीत पाणी संचयित न झाल्याने पारस औष्णिक वीज केंद्रासाठी प्रथमच निगरुणा मध्यम प्रकल्पातून १२.४८ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात १.५0 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, पाणी नदी पात्र, नाला व नव्यानेच खोदलेल्या कॅनॉलच्या माध्यमातून प्रकल्पापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. हे पाणी २१ किलोमीटर कालव्याद्वारे विराहित गावापर्यंत व तेथून स्थानिक नाल्याद्वारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या निगरुणा नदीत पोहोचेल, तेथून २८ किलोमीटरचा प्रवास करीत बाळापूर येथील बंधार्यामध्ये जमा होईल.
पाणी वाडेगाव येथील बंधार्यापर्यंत पोहोचले होते. सोमवारी पाणी येत असलेल्या मार्गाची पाहणी पारस वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, मुख्य अभियंता ( सिव्हिल ) डी.बी. खोब्रागडे, अधीक्षक अभियंता रुपेंद्र गोरे यांनी केली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
या पाण्यामुळे नदी, नाला तसेच कॅनॉलचे पात्र वाहू लागल्याने विवरा, सस्ती, दिग्रस, वरणगाव, वाडेगाव, अंबाशी आदी ग्रामस्थाना दिलासा मिळाला आहे.
या परिसरातील खोल गेलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून गुरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.
प्रकल्पापर्यंत असे पोहोचणार पाणी
पारस विद्युत प्रकल्पासाठी निगरुणा प्रकल्पातून १८ जानेवारी रोजी सोडण्यात आलेले पाणी आणखी १0 ते १५ दिवसांनी पोहोचणे अपेक्षित आहे. निगरुणा प्रकल्प ते पारसपर्यंत या पाण्याचा प्रवास २१ किलोमीटर कालवा, चार किलोमीटर नाला आणि २८ किलोमीटर निगरुणा नदीपात्र, असा होणार आहे.
250 मेगावॉट क्षमतेचा एक संच बंद
पारस औष्णिक विद्युत प्रकल्पात २५0 मेगावॉट क्षमतेचे दोन संच असून, पाण्याच्या तुटवड्यामुळे दोनपैकी एक संच गत काही दिवसांपासून बंद आहे. एका संचामधून दररोज साधारणत: पाच दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होत आहे. एक संच बंद असल्यामुळे पाच दशलक्ष युनिटचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळय़ात पूर्ण क्षमतेने दोन्ही संच सुरू राहावे, यासाठी सध्या एक संच बंद ठेवण्यात आला आहे.
यावर्षी पाणीच उपलब्ध नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने यावर्षी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील अध्यक्ष असलेल्या पाणी आरक्षण समितीने पारस औष्णिक वीज केंद्रासाठी निगरुणा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या आरक्षणासाठी मंजुरी दिली आहे.
पाण्यासाठी मोजले 8.8 कोटी रुपये
पारस प्रकल्पासाठी पाणी गरजेचे असल्यामुळे ८.८ कोटी रुपये मोजून तब्बल ११.४८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षित साठय़ातून १८ जानेवारी रोजी हे पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर टप्या-टप्प्याने हे पाणी सोडण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी सोडण्यात आलेले पाणी सध्या वाडेगावपर्यंत पोहोचले आहे. सोडलेल्या एकूण पाण्याच्या ४0 टक्के पाणी पोहोचणे अपेक्षित आहे.
औष्णिक केंद्र अधिकार्यांची गस्त
पाणी कमी असून, पुढील एक महिना हे पाणी पुरवायचे असल्याने पारस औष्णिक केंद्राच्या अधिकार्यांनी पाणी चोरी होऊ नये म्हणून पाणी येत असलेल्या मार्गावर कडक गस्त सुरू केली आहे.
सहा दलघमीच पाणी मिळणार!
पारस औष्णिक केंद्रासाठी १२.४८ दलघमी पाण्याचे आरक्षण केले असले, तरी पाण्याचा ५३ किलोमीटरचा प्रवास व होणारी पाण्याची नासाडी बघता, पारसला सहा दशलक्ष घनमीटर पाणीच उपलब्ध होण्याची शक्यात पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.
बंधारा कायम ठेवा!
वाडेगाव येथील नदी पात्रात तयार केलेला कोल्हापुरी बंधारा व त्यातील जलासाठा सद्यस्थितीत जसा आहे तसाच ठेवावा, तसेच नदीतील डोह व्यवस्थित करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कंडरकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. हिंमतराव घाटोळ , गोपाळ काळे, रामकृष्ण मसने, अजय भुस्कुटे यांनी केली आहे.
आरक्षणानुसार पारस औष्णिक वीज केंद्राला निगरुणा धरणातून १.५0 दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्याटप्याने उर्वरित आरक्षित पाणी सोडले जाणार आहे. नदी-नाले कोरडे असल्याने पाणी गतंव्यस्थळी पोहोचण्यास २५ दिवस लागतील, यात पाण्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी होते.
- अनिल राठोड,
उप विभागीय अभियंता,
पाटबंधारे उप विभाग, अकोला.
आरक्षणानुसार निगरुणा प्रकल्पातून पाण्याची उचल करण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत पाणी प्रकल्पापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. सध्या विजेचा तुटवडा नसल्यामुळे एक संच बंद असला, तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
- प्रकाश खंडारे,
मुख्य अभियंता, पारस