भाजपच्या पहिल्या यादीत पश्चिम वऱ्हाडातील नऊ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 06:37 PM2019-10-01T18:37:27+5:302019-10-01T18:37:38+5:30
अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील विद्यमान नऊ आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे.
अकोला : राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील विद्यमान नऊ आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. अकोला जिल्ह्यात गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, बुलडाणा जिल्ह्यात चैनसुख संचेती, संजय कुटे, आकाश फुंडकर, तर वाशिम जिल्ह्यात लखन मलिक, राजेद्रं पाटणी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याशिवाय श्वेता महाले यांना चिखलीतून प्रथमच तिकीट मिळाले आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघात गोवर्धन शर्मा हे सलग पाचवेळा निवडुन आले असून, यावेळी त्यांना सहाव्यांदा संधी देण्यात आली आहे. अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडूण आलेल्या रणधीर सावरकर यांना यावेळी दुसरी संधी मिळाली आहे. अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुर्तीेजापूर मतदारसंघात यावेळी तिकीट निश्चित नसलेल्या आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघातून पाच वेळा निवडुन आलेले चैनसूख संचेती यांना सहाव्यांदा उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. राज्य मंत्री डॉ. संजय कुटे यांना जळगाव जामोद मतदार संघातून उमेदवारी मिळाली असून, ते चवथ्यांदा नशिब आजमावणार आहेत. दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव विद्यमान आमदार यांना खामगाव मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर चिखली मतदारसंघातून श्वेता महाले यांना प्रथमच तिकीट देण्यात आले आहे. वाशिम मतदारसंघातून लखन मलिक यांचे तिकीट निश्चित मानले जात नव्हते, परंतु पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. कारंजा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना तिसºयांदा संधी देण्यात आली आहे.