अकोला: कत्तलीसाठी आणण्यात येणाऱ्या नऊ गायी व बैलांची पोलिसांनी सुटका करून जीवनदान दिले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाला शुक्रवारी पहाटे शहरात एका मालवाहू वाहनामध्ये गायी व बैल कोंबून आणत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महामार्गावरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाजवळ सापळा रचून कारवाई केली.एमएच ४0-बीडी-१४0७ क्रमांकाच्या मालवाहू वाहनामध्ये काही गायी व बैलांना निर्दयीपणे कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने शहरात आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाजवळ सापळा रचला. त्यावेळी मार्गावरून मालवाहू वाहन येताच, पोलिसांनी वाहन अडविले. वाहनाची झडती घेतल्यावर त्यात नऊ गायी व बैल निर्दयीपणे कोंबल्याचे दिसून आले. पोलिसांनी ख्वाजा मोईन खान युनूस खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गाय, बैलांसह मालवाहू वाहन जप्त केले. या मुद्देमालाची किंमत ८ लाख १८ हजार रुपये आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय छाया वाघ यांनी केली. (प्रतिनिधी)