पदांना मंजुरी नाही, अन् सुपर स्पेशालिटीच्या उद्घाटनाची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 01:04 PM2019-12-08T13:04:07+5:302019-12-08T13:07:26+5:30
अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरू आहे; पण चारही रुग्णालयांच्या आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाची घाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. चारही हॉस्पिटलच्या पद मंजुरीचा आराखडा संचालकांकडे पाठविण्यात आला. त्यांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यासाठी मनुष्यबळ नसताना केंद्र सरकारकडून होत असलेल्या उद्घाटनाच्या घाईमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढविली आहे. यासंदर्भात एका उच्चपदीय वैद्यकीय अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
अशी आहे सुपर स्पेशालिटीची स्थिती...
राज्यात एकाच वेळेस चारही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता मिळाली असून, त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. यातील औरंगाबाद, अकोला आणि लातूर येथील हॉस्पिटलच्या इमारतीचे निर्माण कार्य ९५ टक्के पूर्ण झाले असून, महत्त्वाची वैद्यकीय उपकरणेही येत आहेत; मात्र यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे.
अकोल्यात पॅरामेडिकलचे चार विभाग रद्द
अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पॅरामेडिकलचे चार विभाग रद्द करण्यात आले आहे. यामध्ये पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, सूक्ष्म जीवशास्त्र व अॅन्टोमॉलॉजी यांचा समावेश असून, त्याचा संपूर्ण भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर पडणार आहे.