ना कॉल, ना ओटीपी, तरीही बँकेतून पैसे गायब! फ्री गेम, अनोळखी ॲप परमिशन टाळा!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:32+5:302021-06-19T04:13:32+5:30
मोबाइलमध्ये विविध गेम, वेब सिरीज, मूव्हीज फ्री मध्ये देण्याचे आमिष देऊन ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करण्यात येते. त्यानंतर या ...
मोबाइलमध्ये विविध गेम, वेब सिरीज, मूव्हीज फ्री मध्ये देण्याचे आमिष देऊन ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करण्यात येते. त्यानंतर या यामध्ये ऑटो रीड ओटीपी ही प्रक्रिया असल्याने आपण ते ॲप डाऊनलोड करताच बँक खात्यातून पैसे गायब होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे स्मार्ट आणि अँड्रॉइड फोन वापरताना अशा प्रकारचे ॲप डाऊनलोड करणे टाळावे हाच यावर उपाय असल्याची माहिती आहे. अन्यथा ओटीपी न मागताच बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत. त्याला मुख्य कारण म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये फ्री गेम, अनोळखी ॲप डाऊनलोड करणे हेच असल्याचेही सायबर तज्ज्ञांनी सांगितले.
ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे
२०१९ - ७३
२०२० - ५७
२०२१ मे पर्यंत - २९
वर्षाला लाखो रुपयांची फसवणूक
तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर वाढला. ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन खरेदी यासह विविध सहज गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या. विमानाचे तिकीट ऑनलाइन काढण्यात येत आहे. अशा प्रकारच्या ऑनलाइन सुविधांमुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. वर्षाला ३० ते ४० लाख रुपयांचा गंडा ऑनलाइनच्या माध्यमातून घातला जातो. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे असल्याची माहिती आहे.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
आपल्या बँक खात्यातून पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर झाल्यानंतर किंवा ते खात्यातून गायब झाल्यानंतर २४ तासांच्या आत सायबर पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र, त्यानंतर वेळ झाल्यास ऑनलाइन पळविलेली रक्कम मिळण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली.
सहा महिन्यांत पंधरा लाखांची रक्कम मिळविली परत ऑनलाइन फसवणुकीद्वारे बँक खात्यातून पैसे पळविल्यानंतर अकोला सायबर पोलिसांनी सहा महिन्यांच्या कालावधीत १५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम परत मिळविली आहे. यामध्ये कापशी येथील एका युवकाचे विमान तिकीट काढल्यानंतर रक्कम गायब करण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम परत मिळविली आहे. अशाप्रकारे सहा ते सात जणांच्या फसवणूक प्रकरणातील रक्कम परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.
अनोळखी ॲप नकोच
बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहार करताना तुमच्या मोबाइलमध्ये अनोळखी ॲप डाउनलोड करण्यास परवानगी द्यायलाच नको. कोणतेही गेम किंवा अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. विविध आमिष देणारे मेसेजेस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे, ते मेसेज डिलिट करावेत. अशाप्रकारे प्रत्येक व्यवहार करताना काळजी घेतल्यास व अनोळखी ॲड फ्री गेम डाऊनलोड न केल्यास तुमची रक्कम सुरक्षित राहू शकते.
तुम्ही कोणत्याही लॉटरीचे तिकीट घेतले नसतानाही तुम्हाला लॉटरी लागल्याचे आमिष देऊन तुमच्या मोबाइलवरील ओटीपी घेऊन रक्कम काढली जाते. मात्र, आता सायबर चोरट्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत विविध ॲप, तसेच लिंक पाठवून तुमच्या खात्यातील रक्कम पळविण्याचा अनोखा फंडा शोधला आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी पूर्णत: सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. आमिषाला बळी न पडल्यास ऑनलाइन फसवणूक टाळता येते.
सचिन कदम
शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला