गर्भवतींना कोविड लस नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 05:04 PM2021-01-14T17:04:15+5:302021-01-14T17:04:23+5:30
Corona vaccine गर्भवतींना सध्यातरी कोविड लस दिली जाणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अकोला: कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा संपली असून, शनिवारपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. चार टप्प्यांमध्ये नियोजित असलेल्या या लसीकरणात इतर सर्वच घटकांचा समावेश करण्यात आला असला, तरी गरोदर मातांना सध्यातरी लसीकरणापासून दूरच ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोविड लसीकरणाची ही मोहीम चार टप्प्यांमध्ये नियोजत आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्व सामान्य व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे, तर चौथ्या टप्प्यात आरोग्य विषयक समस्या असलेल्या ५० वर्षाआतील सर्वसामान्य नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. या चारही टप्प्यांमध्ये गरोदर तसेच स्तनदा मातांना कोविड लसीकरणापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या चारही टप्प्यांमध्ये लाभार्थी जर गरोदर असले, तर तिला सध्यातरी कोविड लस दिली जाणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.