अकोला : पेपरलेस व कॅशलेस व्यवहारांवर भर देत ग्राहकांसाठी विविध सुविधा आॅनलाइन देणाऱ्या महावितरणच्या पेमेंट वॉलेटला मात्र वीज ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६८ वॉलेटधारक आहेत.वीज बिल भरणे अधिक सुलभ व्हावे म्हणून महावितरणने ग्राहकांना पेमेंट वॉलेटची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा महावितरणचा प्रयत्न होता; मात्र तांत्रिक तसेच इतर काही अडचणींमुळे योजना पहिल्या टप्प्यातच अडकली. महावितरणचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या वॉलेटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:चे वीज बिल भरता येते. तसेच इतरांच्या वीज बिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येते. १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येते. प्रतिबिलमागे पाच रुपये मिळवण्याची संधीही वॉलेटधारकाला आहे. यामुळे अनेकांनी वॉलेटसाठी अर्ज करून नोंदणी करून घेतली. अकोला परिमंडळातील अकोला जिल्ह्यात २४, बुलडाणा जिल्ह्यात ३६ व वाशिम जिल्ह्यात आठ वॉलेटधारक आहेत. त्यानंतर काही त्रुटी आणि अडचणी समोर आल्या. आर्थिक विषयांशी संबंध असल्याने सध्या हे वॉलेट बंद आहे.