अकोला : केरळ राज्यात निपाहच्या विषाणूने डोकं वर काढल्याने राज्यातही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; मात्र अद्याप तरी राज्यात निपाहचा धोका नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी आरोग्याच्या बाबतीत खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये निपाह व्हायरसने ग्रस्त रुग्ण आढळला होता. निपाह विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत वर्षी केरळ राज्यात निपाह व्हायरसने १७ जणांचा बळी घेतला होता. विशेष म्हणजे या व्हायरसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अद्याप औषधच नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु महाराष्ट्रात सध्यातरी निपाह व्हायरसचा धोका नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.ही आहेत ‘निपाह’ची लक्षणे
- ताप अधिक काळ राहणे
- डोकेदुखी
- सततच्या उलट्या
- श्वास घेण्यास त्रास होणे
- न्यूरोलॉजिकल समस्या
- अंगदुखी
- मेंदूज्वर
काय काळजी घ्यावी?
- झाडावरून जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत.
- लक्षणे दिसताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- या आजारावर कुठल्याही प्रकारचे औषध नसल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
‘निपाह’या विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत असून, केरळ सर्वाधिक प्रभावीत झाले आहे. केरळमधील आठ जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे; मात्र राज्यात या विषाणूंचा धोका नसल्याने हाय अलर्ट दिलेला नाही. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.