मालमत्ता कर न भरणे भोवले; जिल्हा परिषद सदस्य वर्षा वझिरे अपात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:31 AM2020-11-24T11:31:10+5:302020-11-24T11:31:22+5:30
Akola ZP News अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिला.
अकोला: जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत मालमत्ता कराचा (घर कर) ग्रामपंचायतकडे भरणा केला नसल्याने वर्षा वझिरे यांना जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिला.
अकोला जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांची २०१९ मध्ये निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या व्याळा मतदारसंघातून (गटातून) शिवसेनेच्या वर्षा गजानन वझिरे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. जिल्हा परिषद सदस्य वर्षा वझिरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत व्याळा येथील त्यांच्या सासूच्या नावे असलेल्या मालमत्ता क्र. ८७१ चा घर कराच्या रकमेचा ग्रामपंचायतकडे भरणा केला नाही. त्यामुळे वर्षा वझिरे यांना जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता अपात्र ठरविण्याची मागणी व्याळा येथील श्रीकृष्ण पागधुने यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या अपीलमध्ये केली होती. जिल्हा परिषद सदस्य वझिरे यांच्याविरुध्द दाखल करण्यात आलेल्या अपीलवर ९ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात अंतिम सुनावणी घेण्यात आली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत वर्षा वझिरे यांनी किंवा त्यांच्या कुटुुंबीयांनी घर करापोटी १० हजार ८७१ रुपयांच्या रकमेचा भरणा ग्रामपंचायतकडे केला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम (के) मधील तरतुदीनुसार कसूर केल्याचे स्पष्ट होत असल्याने, जिल्हा परिषद सदस्य वर्षा वझिरे यांना जिल्हा परिषद सदस्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिला. या प्रकरणात अर्जदराच्यावतीने ॲड. संतोष रहाटे यांनी तर गैरअर्जदाराच्यावतीने ॲड. अभय थोरात यांनी काम पाहिले.