कोरोनाच्या संकटात जनता भाजी बाजारातील व्यापाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:59+5:302021-05-10T04:18:59+5:30
अकोला : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अकोला शहरासह जिल्हा संकटात सापडला आहे. मनपाने कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे ...
अकोला : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अकोला शहरासह जिल्हा संकटात सापडला आहे. मनपाने कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित असताना मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी जनता भाजी बाजाराच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याच्या उद्देशातून व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. आयुक्त निमा अरोरा यांनी पुढील कार्यवाही न थांबविल्यास शहरात कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
शहरावर कोरोनाचे मोठे संकट आले असून, शासकीय व खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन व बेडअभावी दररोज २० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आयुक्त निमा अरोरा यांच्या स्तरावर कोणत्याही प्रभावी उपाययोजना न करता थातूरमातूर पद्धतीने काम सुरू असल्याचा आराेप विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी केला. शहरातील वाढलेली रुग्ण संख्या पाहता कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतरही आयुक्त निमा अरोरा यांनी जनता भाजी बाजार येथील सुमारे ६०० व्यापाऱ्यांना नोटीस बजाविल्या असून, त्यांची ११ मे रोजी मनपात सुनावणी घेण्यासाठीचा खटाटोप सुरू केला आहे. कोरोनाच्या संकटात प्रशासनाने सर्व लक्ष जनता भाजी बाजारवर केंद्रित केले असल्याने मनपाच्या हेतूवर साजिद खान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयुक्त निमा अरोरा यांनी सदर कार्यवाही बंद न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा साजिद खान यांनी दिला. यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक इरफान खान, महात्मा ज्योतिबा फुले फळ व भाजीपाला अडत असोसिएशनचे अध्यक्ष सज्जाद हुसेन, अकोला होलसेल फ्रुट अँड व्हेजिटेबल असोसिएशनचे सचिव मोहम्मद युनुस यांच्यासह भाजी बाजारातील अनेक व्यापारी व व्यावसायिक उपस्थित होते.
विकासकामाला विरोध नाही, पण...
काँग्रेस पक्षाचा विकासकामाला विरोध नाही. कोरोनाचे संक्रमण पाहता नागरिकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापार बंद असताना प्रशासन काही दिवसांपासून जनता भाजी बाजारातील व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असल्याचे साजिद खान यांनी नमूद केले.