राज्यात टँकरची संख्या घटली; पाच वर्षांतील नीचांक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:35 AM2021-05-10T09:35:18+5:302021-05-10T09:38:19+5:30
Akola News : टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.
अकोला : सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. परिणामी, टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. यावर्षी राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांत प्रथमच टँकरची संख्या कमी नोंदविली गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. परिणामी, चालूवर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.
२२ जिल्ह्यांत शून्य टँकर
राज्यात टँकरची संख्या कमी झाली आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज अद्याप भासली नाही, तर नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्य आहे.
--बॉक्स--
मराठवाड्यात केवळ नऊ टँकर
गेल्या वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई भासलेल्या औरंगाबाद विभागात केवळ नऊ टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात दोन, तर नांदेड जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
पाच वर्षांतील टँकर संख्या
२०१७ - ७९८
२०१८ - ९३७
२०१९ - ५१७४
२०२० - ३२०
२०२१ - २०२
कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा
पाणीटंचाई विदर्भाच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. राज्यात टँकरची संख्या घटली असली तरी कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कोकणात ९१, पश्चिम विदर्भात ४३, नाशिक विभागात ३०, तर पुणे विभागात २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
कोरोनाच्या स्थितीत दिलासादायक चित्र
सध्या राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोणी व्हेंटिलेटरसाठी, तर कोणी बेडसाठी भटकत आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळत आहे.