अकोला महापालिकेच्या बालवाड्यांना सेविका, मदतनिसांचा ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 02:14 AM2018-01-17T02:14:19+5:302018-01-17T02:15:14+5:30

अकोला : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या पटसंख्येला आळा बसावा म्हणून मनपाने प्रत्येक शाळेत बालवाडी सुरू केली. तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मानधन तत्त्वावर स्वयंसेविका आणि मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. मागील पाच महिन्यांपासून काही शाळांवर ना सेविका रूजू झाल्या ना मदतनीस. काही शाळांवर चक्क मदतनीस सेविकांचे कर्तव्य बजावत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झाले आहे.

Nursery of nurses, helpers 'lost'! | अकोला महापालिकेच्या बालवाड्यांना सेविका, मदतनिसांचा ‘खो’!

अकोला महापालिकेच्या बालवाड्यांना सेविका, मदतनिसांचा ‘खो’!

Next
ठळक मुद्देशिक्षण विभाग कुंभकर्णी झोपेत; मुख्याध्यापक ढिम्म!

आशिष गावंडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या पटसंख्येला आळा बसावा म्हणून मनपाने प्रत्येक शाळेत बालवाडी सुरू केली. तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मानधन तत्त्वावर स्वयंसेविका आणि मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. मागील पाच महिन्यांपासून काही शाळांवर ना सेविका रूजू झाल्या ना मदतनीस. काही शाळांवर चक्क मदतनीस सेविकांचे कर्तव्य बजावत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झाले आहे. याप्रकरणी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक कमालीचे उदासीन आणि ढिम्म असतानाच शिक्षण विभागही कुंभकर्णी झोपेत असल्याचे केविलवाने चित्र समोर आले आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना दमछाक होत असल्याचा गवगवा शिक्षकांकडून सुरू झाला होता, यामुळे पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. समाजातील गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे प्रशासनाने मनपा शाळांमध्ये बालवाडी सुरू करण्यासाठी लोकमतने सातत्याने लिखाण केले. अखेर मनपाने जून-जुलैमध्ये बालवाडी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडी सुरू करत त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना ३ हजार रुपये तर मदतनीस यांना १ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर सेविका व मदतनीस यांना ऑगस्ट २0१७ मध्ये शाळांवर रूजू होण्याचा आदेश होता. सुरुवातीला मानधनावर का असेना, नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीला उड्या मारणार्‍या व ‘लॉबींग’करणार्‍या सेविकांसह काही मदतनिसांनी रूजू होण्याचे आदेश घेऊनही महापालिकेच्या बालवाड्यांकडे सपशेल पाठ फिरवल्याचे लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झाले आहे. काही शाळांवर सेविका नसल्यामुळे मदतनीस शिक्षिकेचे कर्तव्य निभावत आहेत. या सर्व उरफाट्या प्रकाराबद्दल शिक्षण विभागाला अवगत न करता मुख्याध्यापक ढिम्म असल्याचे दिसून आले, तर ज्या सेविका व मदतनिसांची नियुक्ती केली, त्यांचे कामकाज कसे सुरू आहे, याबद्दल माहिती घेण्याची तसदी शिक्षण विभागाने घेतली नसल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.

या शाळांचा बेताल कारभार
हरिहर पेठस्थित मराठी मुलांची शाळा क्र. १९ मध्ये स्वयंसेविका म्हणून अश्‍विनी भुजबळ यांची नियुक्ती झाली होती. त्या अद्यापपर्यंत रुजू झाल्याच नाहीत. मदतनीस उज्ज्वला बोराळे गैरहजर आढळून आल्या. बालवाडीची पटसंख्या २७ असताना ६ विद्यार्थी हजर होते. पोळा चौकातील उर्दू कन्या शाळा क्र. ३ मध्ये सेविका सदफ राणा इर्शादुरहीम खान हजर होत्या. 
मदतनीस सोडून गेल्याचे त्यांनी सांगितले. मराठी मुलांची शाळा क्र. १७ मध्ये सेविका प्रज्ञा खरात रजेवर असल्याची माहिती मिळाली. कहर म्हणजे मदतनीस अनिता अंबुसकर यांना बालवाडीची पटसंख्या माहिती नसताना त्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे चित्र समोर आले. मुख्याध्यापिका कोकिळा काकड यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत काही शिक्षिका मोबाइलवर व्यस्त असल्याचे दिसून आले. मराठी मुलांची शाळा क्र.१ मध्ये २0 पैकी केवळ तीन विद्यार्थी हजर होते. मराठी मुलांची शाळा क्र. ९ मध्ये सेविका शीतल राऊत यांनी मदतनीस सोडून गेल्याचे सांगितले. हिंदी मुलांची शाळा क्र.१, उर्दू मुलांची शाळा क्र. १ मध्ये अद्यापही मदतनीस नाहीत. गुजराती, हिंदी शाळा क्र. १ मध्ये सेविका कविता सोनोने आजपर्यंत रुजू झाल्याच नाहीत. मदतनीस काजल राणा शिक्षिकेचे कर्तव्य बजावत असल्याचे आढळून आले. 

पाच महिन्यांचे मानधन थकीत
मनपाने मानधन तत्त्वावर नियुक्त केलेल्या स्वयंसेविका व मदतनीस यांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन थकीत आहे. एकूण प्रकार पाहता शिक्षण विभाग कवडीचाही गंभीर नसल्याचे समोर आले आहे. 

स्वच्छतागृहांची ऐशीतैशी
मनपाच्या मराठी, उर्दू व हिंदी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय लाजिरवाणी आहे. स्वच्छतेअभावी स्वच्छतागृहांमध्ये घाण व दुर्गंधी पसरल्याचे दिसून आले. 

उर्दू शाळांच्या पटसंख्येत वाढ
मराठी शाळांच्या तुलनेत शहरातील बहुतांश उर्दू शाळांची पाहणी केली असता, विद्यार्थ्यांंच्या पटसंख्येत वाढ झाली असून, सेविका, मदतनीस विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे आढळून आले. 

Web Title: Nursery of nurses, helpers 'lost'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.