अकोला: राज्यातील तेलबियाचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून, यावर्षीही रब्बी हंगामात करडई ९, जवस १२ तर तीळ २४ टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी करण्यात आली. याचा परिणाम तेल दरवाढीवर होण्याची शक्यता आहे.राज्याचा विचार केल्यास यावर्षी आतापर्यंत कोकण विभागात तीळ सरासरी ३०० हेक्टरपैकी २३८ हेक्टर म्हणजेच ७९ टक्के तिळाची पेरणी करण्यात आली आहे. नाशिक विभागात तीनही पिके शून्य टक्के, पुणे विभागात करडई ३,११७ पैकी ५२० हेक्टर म्हणजेच १७ टक्केच पेरणी झाली आहे. जवस सरासरी २८९ पैकी ३७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. ही टक्केवारी १३ आहे, तर तीळ शून्य टक्के आहे. कोल्हापूर विभागात करडई क्षेत्र सरासरी २,३५२ हेक्टर आहे. पैकी ३२६ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. जवस व तीळ शून्य टक्के आहे. औरंगाबाद विभागात करडईचे रब्बीतील सरासरी क्षेत्र ४,२१४ हेक्टर आहे. पैकी सहा हेक्टरवरच यावर्षी रब्बी हंगामात करडईची पेरणी करण्यात आली. जवस व तीळ तर शून्य टक्केच आहे. लातूर विभागातील स्थिती बघितल्यास करडईचे रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी ७६,३१८ हेक्टर आहे. पैकी आतापर्यंत ६,६९० हेक्टरवर म्हणजेच ९ टक्के करडईची पेरणी करण्यात आली. याच विभागात जवस पीक घेतले जाते. हे क्षेत्र सरासरी ४,५३४ हेक्टर आहे; पण यावर्षी ४४८ हेक्टरवर म्हणजेच १० टक्केच पेरणी झाली आहे. तिळाची ३९४ पैकी २४ टक्के म्हणजेच ६ टक्के एवढीच पेरणी करण्यात आली आहे.विदर्भात करडी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. तथापि, या विभागातही हे क्षेत्र वेगाने कमी झाले असून, या रब्बी हंगामात आतापर्यंत अमरावती विभागात सरासरी १,२३१ पैकी केवळ ६९ हेक्टर म्हणजेच ६ टक्केच पेरणी झाली असून, जवस शून्य टक्के तर तीळ ११८ पैकी २४ हेक्टर म्हणजेच २० टक्के पेरा आटोपला आहे. नागपूर विभागाची स्थिती वेगळी नाही. या विभागात करडई शून्य टक्के, जवस सरासरी १३,१९५ पैकी १,८२७ हेक्टर म्हणजेच १४ टक्के पेरणी झाली आहे. तीळ १८० पैकी ४५ हेक्टर म्हणजेच १४ टक्के एवढीच पेरणी झाली आहे.