बार्शीटाकळी : जमिनीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी बार्शीटाकळी येथील अकोली वेस परिसरात घडली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.अकोली वेस परिसरातील मोबीन रहमत खान यांनी गुरुवारी रात्री पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे जवळचे नातेवाईक वहीद खान, सईद खान आणि अय्याज खान यांनी आपल्या वडील मुर्तुजा खान (५५) यांना जमिनीच्या वादातून मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून बार्शीटाकळी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)