अकोला जिल्ह्यात एक हजारावर मोबाइल मिसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:16 PM2019-02-04T12:16:03+5:302019-02-04T12:16:38+5:30
अकोला: जिल्ह्यात मोबाइल चोरट्यांनी चोरलेल्या तसेच खिशातून गहाळ झालेल्या, वाहनातून पळविलेल्या मोबाइल मिसिंगच्या तब्बल एक हजारावर तक्रारी झालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्यात मोबाइल चोरट्यांनी चोरलेल्या तसेच खिशातून गहाळ झालेल्या, वाहनातून पळविलेल्या मोबाइल मिसिंगच्या तब्बल एक हजारावर तक्रारी झालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील ६०० पेक्षा अधिक मोबाइल शोधण्यात सायबर सेलला यश आले असून, सदर मोबाइल कोणत्या ग्राहकांकडे आहे, त्याचा वापर कुठे होतेय, ही इत्थंभूत माहिती सायबर सेलने पोलीस ठाण्यांकडे पाठविली आहे.
राजराजेश्वर पालखी कावड महोत्सव, श्रीरामनवमी शोभायात्रा, गणेशोत्सव मिरवणूक, दुर्गादेवी मिरवणूक, ईद, धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी, दिवाळी खरेदीसाठी झालेल्या गर्दीत अनेकांचे मोबाइल चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींच्या खिशातूनही मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मोबाइल गहाळ किंवा चोरी झाल्यानंतर देशविघातक कृत्य किंवा गैरकायदेशीर कामांसाठी मोबाइलचा किंवा सीमकार्डचा वापर होऊ नये यासाठी पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या असून, जिल्ह्यात तब्बल एक हजारावर मोबाइल चोरी तसेच गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी ६०० च्यावर मोबाइलचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी या मोबाइलचा शोध घेऊन मोबाइल वापरणाºयाच्या नाव, गाव, पत्त्यासह माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे. सायबर सेलकडून दिवसाआड मोबाइल शोधण्यात येत असले तरीही पोलीस ठाण्याच्या स्तरावरून संबंधित ग्राहक ांना मात्र त्यांचे मोबाइल परत देण्याचे प्रमाण कमी असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मोबाइल परत देण्यास तांत्रिक अडचणी
चोरीस गेलेला किंवा गहाळ झालेला मोबाइलचा शोध लागल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांकडे ते देण्यात येतात. यासाठी पोलीस ठाण्यांच्या स्तरावरून मोबाइल परत देण्यात येतात; मात्र हे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याची माहिती आहे. आयएमईआय क्रमांक बदलण्यात येत असल्यामुळेही पोलिसांना मोबाइल परत देताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मोबाइल परत देण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मिसिंग किंवा चोरीस गेलेल्या मोबाइलची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचा तांत्रिक मुद्यांद्वारे तातडीने तपास करण्यात येतो. सदरचा मोबाइल कोणत्या परिसरात सुरू आहे. कोणत्या व्यक्तीकडे आहे, याचा शोध तातडीने घेण्यात येतो. त्यामुळे अनेकांना त्यांचा चोरीस गेलेला मोबाइल परत देण्यात आला आहे. सायबर सेलकडून कोणतीही दिरंगाई न करता मोबाइल शोधण्याचे कामकाज करण्यात येत आहे.
- सीमा दाताळकर
प्रमुख, सायबर सेल