‘बिझनेस लोन’च्या नावाखाली विद्यार्थिनीची आॅनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:00 PM2019-08-13T14:00:45+5:302019-08-13T14:00:50+5:30
बँक फायनान्स संदर्भात वेगवेगळे कारण देत ७८ हजार ५०० रुपये काजोलकडून उकळण्यात आले.
अकोला : आदर्श कॉलनी येथील रहिवासी एका विद्यार्थिनीची ‘बिझनेस लोन’च्या नावाखाली ७८ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आदर्श कॉलनी येथील रहिवासी युवती काजोल ही बी. कॉम.ची विद्यार्थिनी असून, तिने बिझनेस लोन मिळेल का, म्हणून तिच्या मोबाइलवर आॅनलाइन शोध घेतला. तेव्हा तिला ‘क्विक अॅड इझी फायनान्स’ नावाची लिंक प्राप्त झाली. ही लिंक ओपन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ जून रोजी तिला दिव्या नामक महिलेचा फोन आला. तुम्ही आमच्या लिंकला भेट दिली म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकतो, असे म्हणाली. त्यानंतर दिव्या नामक महिलेने काजोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक केवायसी अर्ज पाठविला. सोबतच तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल, असा मॅसेजदेखील दिला. हा केवायसी अर्ज भरून काजोलने पुन्हा त्याच व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठविला व मागणीनुसार आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व फोटो पाठविले. अर्जाचे शुल्क म्हणून तिने दिलेल्या फिनो बँक खात्यामध्ये २४ जून रोजी तीन हजार रुपये जमा केले. त्यानंतर दिव्याने सांगितल्यानुसार, काजोलला तिच्या साहेबांचा व्हेरीफिकेशनसाठी फोन आला. एक लाख रुपयांचे लोन मंजूर झाल्याचे त्याने सांगितले; मात्र लोनची ट्रान्सफर फी म्हणून २१ हजार रुपये भरावी लागेल. लोनसोबत ती रक्कम परत येईल, असा विश्वास दिला. यावर विश्वास बसल्याने काजोलने फिनो बँकच्या त्याच खात्यावर २१ हजार रुपये पुन्हा भरले. त्यानंतर त्याच रेफरन्सने बँक फायनान्स संदर्भात वेगवेगळे कारण देत ७८ हजार ५०० रुपये काजोलकडून उकळण्यात आले. त्यानंतरही पुन्हा ‘एनओसी’साठी २६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यावरून काजोलने पोलिसांत तक्रार दिली.