- आशिष गावंडे
अकाेला:मागील दहा महिन्यांपासून शहरातील खासगी शिकवणी संचालक विद्यार्थ्यांना माेबाइलद्वारे ऑनलाइन पध्दतीने शिक्षणाचे धडे देत असले तरी यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम हाेत असून ‘स्क्रिन टाइम’ वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये डाेकेदुखी व डाेळ्यांचे विकार वाढले आहेत. ही धाेक्याची घंटा लक्षात घेता इयत्ता ९ वी,१० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु केल्याप्रमाणे ऑफलाइननुसार खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी पालक वर्गातून समाेर आली आहे.
काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य शासनाने खासगी शिकवणी वर्ग संचालकांना ऑनलाइन प्रणालीचा पर्याय दिला. काेराेनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून लहान,माेठ्या विद्यार्थ्यांना प्रथमच ऑनलाइन शिक्षणासाठी सामाेरे जावे लागले. यामुळे शिक्षण क्षेत्रात माेठा बदल घडून आला. ऑनलाइनमुळे गुरूजन व विद्यार्थ्यांमधील भावनिक नातेच यामुळे संपुष्टात आल्याचे चित्र आहे. एरव्ही शिकवणी वर्गात पाच ते सहा तास बसून शिक्षकांकडून समस्या साेडवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर ऑनलाइन प्रणालीमुळे परिणाम झाला आहे. शिकवणीसाठी इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातातही नाइलाजाने अत्याधुनिक माेबाइल देण्याची वेळ पालकांवर ओढावली आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘स्क्रिन टाइम’ वाढल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आराेग्यावर हाेत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये डाेकेदुखी, डाेळ्यांचे विकार वाढण्यासाेबतच लहान विद्यार्थ्यांमध्ये माेबाइलचे व्यसन जडण्याच्या धास्तीने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इयत्ता ९वी,१० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु केल्याप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांचे भविष्य व आराेग्य लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ऑफलाइन पध्दतीने खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्याची परवानगी द्यावी,अशी आग्रही मागणी अकाेलेकरांनी केली आहे.
लिखाणाचा विसर;‘स्क्रिन शाॅट’चा वापर
ऑफलाइन पध्दतीमध्ये शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना वहीत लिखाण करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ऑनलाइन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांनी शाॅर्टकट शाेधला असून वहीत नाेंदी न करता त्याचा ‘स्क्रिन शाॅट’काढण्याचा मार्ग निवडला. यामुळे लिखाणाचा सराव बंद झाल्याने विद्यार्थी परीक्षेत लिखाणाचा कसा सामना करतील,या विवंचनेत पालक सापडले आहेत.
लाेकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने इयत्ती ९ वी, १० वी व १२ वीचे वर्ग सुरु करण्याला परवानगी दिली आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करून खासगी शिकवणी वर्ग देखील सुरू करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे हित पाहता यासंदर्भात स्थानिक लाेकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.