अकोला : हलक्या अल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पुन्हा आठ ते दहा दिवस पाऊस लांबल्याचे भाकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाच्यावतीने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असताना वºहाडातील पाच जिल्ह्यांतील धरणांतील जलसाठाही संपण्याच्या मार्गावर आहे.आजमितीस या धरणांमध्ये केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात ११ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने टंचाईचे चित्र आणखी गडद झाले.वºहाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. तथापि, गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने यातील बहुतांश धरणात अल्प जलसाठा संचयित झाला होता. आजमितीस या सर्व धरणांमध्ये १२.५१ टक्केच साठा आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात तर अपेक्षित पावसाच्या अर्धाही पाऊस झाला नसल्याने या जिल्ह्याची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती बघितल्यास पेनटाकळी व खडकपूर्णा ही मोठी धरण शून्य टक्क्यावर आहेत. नळगंगा मोठ्या धरणात केवळ ७.६३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम धरणातील मस, कोराडी व तोरणा शून्य टक्क्यावर आहे. ज्ञानगंगा धरणात ६.४८ टक्के, पलढग ८.९२ टक्के, मन १३.४७ टक्के, तर उतावळी धरणात १८.९० टक्के साठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात ११.४ टक्के, वाणमध्ये ३१.५१ तर मध्यम धरणातील निर्गुणा व घुगंशी बॅरेज शून्य टक्क्यावर आहे. उमा धरणात केवळ १.२८ टक्के तर मोर्णा धरणात १०.२३ टक्केच साठा आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल शून्य टक्के, अडाण ५.८६ तसेच एकबुर्जी धरणात केवळ ६.७७ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा धरणाची पातळी खोल गेली असून, या धरणात केवळ १४.५७ टक्केच साठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात २३.०८,अरुणावतीमध्ये ८.९५ तर बेंबळा या धरणामध्ये १९.३८ टक्केच साठा आहे.