अकोला: जिल्ह्यात कोविड लसीकरणास सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधी झाला असून, आतापर्यंत ११ हजार ८८५ लाभार्थींनी कोविडची लस घेतली. यामध्ये लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६२४ आहे. यावरून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत निरुत्साह असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस, महसूल विभागासह इतर फ्रंट लाईन वर्कर मात्र लसीला प्राधान्य देत आहेत.
जिल्ह्यात कोविड लसीसाठी आतापर्यंत १७ हजार ४०० लाभार्थींची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ८८५ लाभार्थींनी लस घेतली आहे. यामध्ये लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ११ हजार २६१ आहे, तर दुसरा डोस केवळ ६२४ लाभार्थींनीच घेतला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोविड लसीकरणाची मोहीम संथ गतीने सुरू असून, आरोग्य कर्मचाऱ्यांचाच निरुत्साह दिसून येत आहे. या विरुद्ध जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, महसुल कर्मचारी तसेच इतर फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांमध्ये कोविड लसीविषयी उत्सुकता असून ते लस घेण्यास पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार ९०० डोस प्राप्त झाले असून, हे सर्व सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस आहे.
लसीचे सात व्हायल गेले चोरीला
जिल्ह्यात पातुर तालुक्यातील चतारी आरोग्य केंद्रातून कोविड लसीचे ७ डोस चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशी आहे लसीकरणाची स्थिती
एकूण प्राप्त डोस - २८,९००
लाभार्थींची नोंदणी - १७,९००
आतापर्यंत लस घेतलेले लाभार्थी - ११ हजार ८५५
पहिला डोस घेतलेले लाभार्थी - ११, २६१
दुसरा डोस घेतलेले लाभार्थी - ६२४
वाया गेलेले डोस - १,२४१
जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीमेंतर्गत पहिला डोस देण्याची प्रक्रिया आठडाभरात संपणार आहे. तसेच मागील पाच दिवसांपासून लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात मंगळवारपासू बार्शिटाकळी आणि मुर्तिजापूर येथे दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू करण्यात येईल.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला