वर्षभरात केवळ ६५० शस्त्रक्रिया!
By admin | Published: May 2, 2017 01:27 AM2017-05-02T01:27:22+5:302017-05-02T01:27:22+5:30
महाआरोग्य शिबिरातील शस्त्रक्रिया धिम्या गतीने : रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणण्यात यंत्रणा अपयशी
अतुल जयस्वाल - अकोला
शासनाच्यावतीने जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात तपासणी झाल्यानंतर शस्त्रक्रिया सुचविलेल्या एकूण रुग्णांपैकी वर्षभरात केवळ ६५० रुग्णांवरच शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. रुग्णांची अनास्था व त्यांना रुग्णालयापर्यंत आणण्यात आरोग्य यंत्रणेला आलेले अपयश यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत ६५० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अकोला येथे मार्च २०१६ मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शस्त्रक्रिया, अस्थिरोग, नाक-कान-घसा, नेत्ररोग, दंतशास्त्र, स्त्रीरोग, युरॉलॉजीशी संबंधित हजारांवर रुग्णांची नोंद घेण्यात आली. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांकडे शस्त्रक्रियांसाठी ‘रेफर’ करण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य शिबिरात रुग्णांच्या केवळ प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या होत्या. पुढील तपासण्यांसाठी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी रुग्णांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यामध्ये ८०० पेक्षा अधिक रुग्ण होते. त्यानंतर २३ मार्च ते ३१ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४१५ रुग्णांवर सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बहुतांश शस्त्रक्रिया मार्च व एप्रिल महिन्यात पार पडल्या. त्यानंतर मात्र रुग्णांकडून शस्त्रक्रिया करवून घेण्याबाबत फारसे स्वारस्य दाखविण्यात आले नाही. त्यामुळे पुढील सहा महिन्यात शस्त्रक्रियांची गती आणखीनच मंदावली. ३१ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ २३३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशाप्रकारे २३ मार्च २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत तपासणी झालेल्यांपैकी एकूण ६५० रुग्णांवरच शस्त्रक्रिया झाल्याची नोंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे.
‘आयएमए’कडील आकडा अनुपलब्ध
महाआरोग्य शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांवर ‘आयएमए’अंतर्गत काही खासगी रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हा आकडा मात्र अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही. खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया झालेल्यांची माहिती समोर आल्यानंतर एकूण परिस्थिती समोर येऊ शकते.
विशेष तपासण्या ११०० वर
या शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांना विशेष तपासण्या सूचविण्यात आल्या होत्या. मार्च २०१७ अखेरपर्यंत ११७९ रुग्णांच्या विशेष तपासण्या करण्यात आल्या.
स्वस्थ महाराष्ट्र अभियानही ठरू नये फार्स
१ मे पासून जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ होणार आहे. गरीब, गरजू रुग्णांकरिता विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच उद्देशाने गतवर्षी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. या पृष्ठभूमीवर नव्याने येऊ घातलेले हे अभियानही केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.