अकोला : राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे वास्तव आहे. गृहमंत्र्यांनी राज्यात दोन टप्प्यात १२५०० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. मात्र या भरती प्रक्रिया पूर्वी पोलीस दलात कार्यरत असलेल्या अकोला जिल्ह्यातील पोलिसांची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यातील लोकसंख्या २० लाखांच्या घरात असून त्या तुलनेत पोलीस कर्मचारी केवळ २००० च्या आसपास आहेत. त्यामुळे सुमारे एक हजार लोकसंख्येमागे केवळ एकच पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याचे वास्तव आहे. यावरून एक हजार नागरिकांच्या बंदोबस्ताचा तसेच गुन्हेगारीचा ताण एक पोलीस कर्मचारी खांद्यावर पेलत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्यच्या तुलनेत कार्यरत पोलिसांची संख्या तोकडी असल्याने पोलिसांवरील ताण प्रचंड मोठा असल्याची माहिती आहे.
पोलिसांवर ताण
जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस प्रचंड कमी आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी, चोऱ्या व विविध प्रकारचे बंदोबस्त सतत सुरू असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचे परिणाम काही पोलिसांचा हृदयविकाराने कार्यरत असताना मृत्यू झाल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे गरजेचे असून ही संख्या वाढल्याने कार्यरत असलेल्या पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती आहे. काही पोलिसांना तपास कामी रात्रंदिवस ड्युटीवर राहावे लागते. तर अनोळखी मृतदेह उचलणे बंदोबस्त यासारख्या ठिकाणांवर रात्रंदिवस ड्युटी द्यावी लागत असल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करून त्यांच्या ड्युटी लावण्यात येतात. प्रत्येकाची साप्ताहिक रजा तसेच महत्त्वाचे काम असलेल्या पोलिसांना रजा देऊन इतरांवर कामाचा ताण वाढणार नाही. याची खबरदारी घेण्यात येते. त्यानुसार ड्युटी देण्यात येते मात्र संख्या कमी असल्याने पोलिसांवर ताण येतो. पोलिसांची ड्युटी बारा तास ते अठरा तासांपर्यंत होते.
- मोनिका राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अकोला