वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी यादीत खुल्या व ओबीसी उमेदवारांची एसईबीसीत घुसखोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:55 AM2019-07-10T11:55:49+5:302019-07-10T11:55:57+5:30
खुल्या व ओबीसी उमेदवार एसईबीसी (मराठा आरक्षण) वर्गवारीत घुसखोरी करीत असल्याने, मराठा आरक्षण प्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केला आहे.
अकोला: नीट २0१९ वैद्यकीय प्रवेशाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी प्रकाशित करण्यात आली. नीटच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नोटीस क्रमांक ४ मध्ये राखीव आरक्षणामध्ये खुला किंवा इतर जातीला समाविष्ट करण्याचा दावा गृहीत धरला जाणार नाही. असे स्पष्ट म्हटलेले असतानाही नोंदणी यादीमध्ये खुल्या व ओबीसी उमेदवार एसईबीसी (मराठा आरक्षण) वर्गवारीत घुसखोरी करीत असल्याने, मराठा आरक्षण प्राप्त विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी केला आहे.
सध्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. नोेंदणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांची जात संवर्गनिहाय यादी प्रकाशित करण्यात आली; परंतु या यादीमध्ये खुला व ओबीसीचे उमेदवार हे मराठा आक्षरणाचा लाभ घेण्यासाठी मराठा प्रवर्गात रूपांतरीत केले जात असल्याचा प्रकार घडत असल्याने, मराठा उमेदवारांवर अन्याय होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. विद्यार्थी यात कागदपत्रे अपलोड करू शकतो; मात्र खुल्या प्रवर्गामधून आरक्षित वर्गवारीमध्ये बदल किंवा नोंदणी झाल्यानंतर नवीन वर्गवारीसाठी हक्क ग्राह्य धरल्या जाणार नाही. असे नीटच्या नोटीस क्रमांक ४ मध्ये स्पष्ट निर्देश दिले असतानासुद्धा कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांची वर्गवारी बदलण्यात आली आहे. ओबीसी, खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांची वर्गवारी चक्क एसईबीसी (मराठा आरक्षण) वर्गवारी रूपांतरित करण्यात येत आहेत. २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये विदर्भात एसईबीसी या वर्गवारीतील कटआॅफ कमी असल्यामुळे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी जात प्रवर्ग बदलण्यात आला. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत एसईबीसी विद्यार्थी मागे फेकले जात असल्यामुळे एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेतून ते बाद होत आहेत. शासनाने मराठा आरक्षण दिल्यानंतरही मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सुधारित राज्य गुणवत्ता यादी प्रकाशित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वैद्यकीय संचालक, आयुक्तांकडे तक्रार!
प्रसिद्ध झालेल्या नोंदणी यादीमध्ये विदर्भात एसईबीसी या वर्गवारीतील कटआॅफ कमी असल्यामुळे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी जात प्रवर्ग बदलण्यात येत असल्याची तक्रार अकोल्यातील समीक्षा देशमुख या विद्यार्थिनीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांकडे केली आहे.
जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी न करण्याचे शासनाचे आदेश असून, विद्यार्थी कागदपत्रे अपलोड करू शकतो; परंतु खुल्या प्रवर्गातून आरक्षित प्रवर्गात बदल किंवा नोंदणी झाल्यानंतर नवीन वर्गवारीत हक्क दाखवू शकत नाही, असे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा कागदपत्रे पडताळणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांची वर्गवारी बदलण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शासनानेसुद्धा विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी न करण्याचे निर्देश दिले असल्यामुळे इतर वर्गवारीच्या विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले आहे.