अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’मध्ये राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता ‘अनलॉक’मध्ये मंदिरे उघडी करून, मंदिरांमध्ये किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील १ लाख वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शनिवारी येथे दिला.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत ‘लॉकडाऊन’मध्ये राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहेत; परंतु आता ‘अनलॉक’मध्ये सर्व काही सुरू होत असताना, राज्यातील मंदिरे मात्र बंद आहेत. मंदिरे उघडी करून, किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यात यावी, यासाठी वारकऱ्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन, उपोषणे केली; मात्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे सरकारने वारकऱ्यांविषयी झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप गणेश महाराज शेटे यांनी केला. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची तारीख निश्चित करून, मंदिरांमध्ये किमान ५० भाविकांना भजन, कीर्तनाची परवानगी देण्यासंदर्भात सरकारने २६ आॅगस्टपर्यंत वारकºयांना लेखी पत्र द्यावे, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी राज्यातील १ लाख वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये ठिय्या आंदोलन करणार असून, या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होतील, असेही गणेश महाराज शेटे यांनी सांगितले.
मंदिरे उघडी करा, अन्यथा एक लाख वारकरी पंढरपुरात ठिय्या देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 6:58 PM