ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करा; विकास निधी बक्षीस मिळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:35+5:302020-12-23T04:15:35+5:30
पातूर : बाळापूर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या ग्रामपंचायतच निवडणुका अविरोध करा व गावाच्या विकासाकरिता बक्षिसाच्या स्वरूपात निधी मिळवा, असे ...
पातूर : बाळापूर विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या ग्रामपंचायतच निवडणुका अविरोध करा व गावाच्या विकासाकरिता बक्षिसाच्या स्वरूपात निधी मिळवा, असे आवाहन बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.
बाळापूर विधानसभा मतदारसंघात ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये पातूर तालुक्यात २३, तर बाळापूर तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. गावातील सर्वांनी एकमताने ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध केल्यास गावाच्या विकासाकरिता २५-१५ अंतर्गत विकास निधीमधून गावाच्या विकासाकरिता बक्षीस स्वरूपात निधी देण्याची योजना आहे. यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाल्या १७, १५, १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतला १ कोटी ११, ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीला ५० लाख, तर सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतला २५ लाख रुपये विकास निधी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. कोरोनासारख्या काळात माता, भगिनी, वृद्धांना मतदानाकरिता बाहेर पडण्याची वेळ येऊ नये, प्रशासनावरील निवडणुकांचा भार कमी व्हावा व गावातील सर्वांनी एकमताने अविरोध निवडून द्यावे, गट-तटाचे राजकारण निर्माण न होता गावात शांतता राहावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.
........काेट....
कोरोनासारख्या काळात नागरिकांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचे काम पडू नये. गावातील गटा-तटाचे राजकारण संपुष्टात येऊन गावाचा विकास व्हावा यासाठी बाळापूर मतदारसंघातील अविरोध निवडणूक होणाऱ्या गावांना विकास निधी म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घेऊन गावाचा विकास साधावा.
-नितीन देशमुख, आमदार