रिकामटेकड्यांची वाहने जप्त करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:07 PM2020-04-03T17:07:44+5:302020-04-03T17:07:51+5:30
गाड्या जमा करून ठेवण्यासाठी शास्त्री स्टेडियमची जागा वापरण्यास परवानगीही दिली आहे.
अकोला : जिल्ह्यात संचारबंदी काळातही कोणतेही कारण नसताना आपली वाहने घेऊन फिरणाऱ्या रिकामटेकड्यांची वाहने जप्त करून शास्त्री स्टेडियममध्ये संचारबंदी संपेपर्यंत ठेवण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले असून, गाड्या जमा करून ठेवण्यासाठी शास्त्री स्टेडियमची जागा वापरण्यास परवानगीही दिली आहे.
जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असतानाही या ना त्या कारणाने उगीचच वाहने घेऊन भटकंती करणाऱ्यांची संख्या व उपद्रव वाढत चालला असून, त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मूळ हेतू साध्य होत नाहीय. यामुळे लोक घराबाहेर पडून फिरत तर असतात; पण हेच लोक नंतर पुन्हा आपल्या कुटुंबात जातात. सद्यस्थितीत हे धोकादायक ठरू शकते. लोकांना दैनंदिन आवश्यक वस्तू व सामान खरेदीसाठी विकेंद्रित पद्धतीने उपलब्धता सर्वच भागात करून देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घरापासून अगदी जवळच्या ठिकाणी लोक शक्यतो पायी जाऊन भाजीपाला, किराणा, आवश्यक औषधी खरेदी करू शकतात; मात्र काही लोक हे विनाकारण आपली दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन शहरात फिरत असतात. या लोकांची चौकशी करून त्यांचे बाहेर फिरण्याचे कारण संयुक्तिक नसल्यास त्यांची वाहने पोलीस आता जप्त करून ती शास्त्री स्टेडियमच्या जागेत ठेवणार आहेत. यासंदर्भात पोलिसांनी कडक कारवाई करावी व विनाकारण फिरणाºयांना आळा घालावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.