अकोला : कोविड भत्त्यासाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोविड वॉर्डात काम बंद करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांना २४ तासात रुजू व्हावे, अशी नोटीस जीएमसी प्रशासनाने बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोटीसनुसार, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी २४ तासात कोविड सेवेत रुजू व्हावे, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र ही नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे आंतरवासिता डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयात कोविड वॉर्डात कार्यरत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विद्यावेतनासोबतच कोविड भत्ता दिला जात आहे; मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अद्यापही कोविड भत्ता लागू करण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १२० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला होता. आंतरवासिता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात रुग्णसेवा द्यावी म्हणून जीएमसी प्रशासनाकडून कारवाईचा धाक दाखविण्यात आला होता. शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून आंतरवासिता डॉक्टरांना आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे; परंतु या संदर्भात आंतरवासिता डॉक्टरांना विचारले असता, या प्रकारची कुठलीही नोटीस आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड सेवा बंद केलेल्या आंतरवासिता डॉक्टरांना रुजू होण्याचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 10:39 AM