महापालिकेच्या बांधकाम विभागातील १६ कनिष्ठ अभियंत्यांची चार झाेनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच झाेनमध्ये मागील तीन वर्षांपासून कामकाज करणाऱ्या अभियंत्यांची बदली केल्यास भविष्यातील विकासकामे अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार हाेतील, असा दावा करीत बांधकाम विभागाने अभियंत्यांच्या झाेननिहाय बदलीचा प्रस्ताव आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे सादर केला हाेता. दरम्यान, आजराेजी शासनाकडून प्राप्त ५७ काेटी रुपयांतून प्रभागांमध्ये विविध विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांची कनिष्ठ अभियंत्यांना इत्थंभूत माहिती असल्याने त्यांच्याकडूनच प्रस्ताव तयार करणे अपेक्षित हाेते. परंतु प्रशासनाच्या निर्णयामुळे काेट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव रखडणार असल्याची जाणीव हाेताच सर्वपक्षीय नगरसेवक अस्वस्थ झाले हाेते. यासंदर्भात गुरुवारी माजी महापाैर विजय अग्रवाल, सेनेचे गटनेता राजेश मिश्रा, माजी नगरसेवक जयंत मसने यांनी आयुक्त अराेरा यांची भेट घेतली.
आधी प्रस्ताव निकाली काढा!
नगरसेवकांच्या सूचनेनुसार व आवश्यकता असणाऱ्या विकासकामांची पाहणी केल्यानंतरच अभियंत्यांनी प्रस्ताव तयार केले आहेत. काही प्रस्ताव तयार करण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. अशावेळी कनिष्ठ अभियंत्यांची बदली केल्यास नवख्या अभियंत्यांचा गाेंधळ उडेल. त्यामुळे आधी प्रस्ताव निकाली काढा, त्यानंतर बदल्या करण्याची सूचना विजय अग्रवाल, राजेश मिश्रा यांनी केली.
घनकचऱ्याच्या ठरावावर माथापच्ची
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत नायगाव येथील डंपिंग ग्राउंडवरील पाेकलँड मशीन, सहा मजूर तसेच भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टर व शाैचालयांची देखभाल करणाऱ्या महिला बचत गटांची थकीत देयके अदा करण्यासह त्यांना मुदतवाढ देण्यासाठी सत्ताधारी भाजपने १४ जून राेजी विशेष सभेचे आयाेजन केले हाेते. अशा प्रस्तावाला यापूर्वी देण्यात आलेली मुदतवाढ नियमबाह्य असल्याचे सांगत आयुक्तांनी भाजपची मागणी फेटाळून लावली हाेती. हा ठराव मंजूर करण्याच्या मुद्द्यावरही यावेळी चांगलीच माथापच्ची झाल्याची माहिती आहे.