अकोला : महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत असल्याचे आढळून येत आहे. अशास्थितीत साथीचे आजार बळावले असून, साथ रोगांची लक्षणे व कोरोनाच्या लक्षणांमध्ये साम्य असल्यामुळे भीतीपोटी कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी असुविधेची सबब पुढे करीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठ फिरविल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुद्धा महापालिकेचा वैद्यकीय आराेग्य विभाग झाेपेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात एप्रिल ते जून महिन्यांपर्यंत कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. शहराच्या प्रत्येक भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने मनपा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र होते. रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागरिकांच्या ‘थ्रोट स्वॅब’चाचणीसाठी झोननिहाय शिबिराचे आयोजन केले होते. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत घसरण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र हाेते. त्यानंतर पुन्हा ऑक्टाेबर व नाेव्हेंबर महिन्यांत घसरण झाली. दिवाळी संपताच काेराेना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असताना मनपाची वैद्यकीय आराेग्य यंत्रणा कमालीची बेफिकर असल्याचे दिसत आहे.
अकोलेकर बेसावध; प्रशासनाचा कानाडोळा
शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरीही अकोलेकर कमालीचे बेसावध असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मनपा प्रशासनाकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. तोंडाला रुमाल किंवा मास्क न लावता नागरिक घराबाहेर निघताना दिसत आहेत.
आता हाेम क्वारंटाइनसाठी लगबग !
जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांची पूर्तता होत नसल्याची परिस्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डातील शौचालयांची स्वच्छता राखली जात नसून स्वच्छतेसाठी साफसफाई कर्मचारी फिरकत नसल्याचा सूर रुग्णांमधून उमटताे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेले रुग्ण आता घरातच विलगीकरणाला प्राधान्य देत असून यामुळेही संसर्गाचा धाेका वाढल्याची माहिती आहे.