नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मळसूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या मळसूर, सायवणी, पहाडसिंगी, पांगरताटी, वनदेव आदी गावांमध्ये व्हायरल फिव्हरची साथ परसली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावांमध्ये सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
गत दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील गावांमध्ये व्हायरल फिव्हरची साथ पसरल्याचे चित्र आहे. यामध्ये सर्दी, खोकला, ताप या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. याकडे आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य कर्मचारी गावामध्ये जनजागृती करीत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी असणे गरजेचे आहे; मात्र येथील आरोग्य कर्मचारी हे बाहेरगावाहून ये-जा करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यालय ओस पडले आहे. तसेच आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी गेला, तर त्यांच्याशी मुजोरी करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधला होता; मात्र चित्र जैसे थे असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
----------------------
मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भावाला घेऊन गेलो असता तेथील डॉक्टरने माझ्या भावाला अकोला येथे खासगी वाहनाने घेऊन जायला सांगितले. आरोग्य केंद्रातील ॲम्ब्युलन्स बंद आहे.
- मोहन लाहुडकर, सायवणी, रुग्णाचा भाऊ.
-----------------
प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिले आहे.
- डॉ. आशिफ शेख बागवान, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र मळसूर.
------------------------
रुग्णवाहिका बंद; रुग्णांना आर्थिक भुर्दंड
मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेली रुग्णवाहिका बऱ्याच दिवसांपासून बंद पडली आहे. रुग्णांची स्थिती गंभीर असल्यास येथील डॉक्टर अकोला येथे उपचारार्थ पाठविण्याचा सल्ला देतात. रुग्णवाहिका बंद असल्याने रुग्णांना खासगी वाहनाने जावे लागत असल्याने रुग्णांसह नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रुग्णवाहिका देण्याची मागणी होत आहे.