अकोला: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागाची सकाळी आणि सायंकाळी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र राज्यातील अनेक शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग बंद असतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांची ही गैरसोय टाळण्यासाठी सर्वच शासकीय रुग्णालयांना सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पत्राद्वारे सर्वांनाच निर्देश दिले आहेत. राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील बाह्यरुग्ण विभाग सकाळी ८.३० ते १२.३० आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेस सुरू असणे अपेक्षित आहे. राज्यातील अनेक ठिकाणी या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसून केवळ सकाळच्या वेळेतच बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येतो. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यांची गैरसोय होते. त्यामुळे आता सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये सायंकाळी देखील बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवणे, तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही ओपीडी राहिल सुरू
सोमवार आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली, तरी शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे. तसेच रुग्णालयांमध्ये दुपारी १ ते ४ वाजताच्या सुमारास विशेष बाह्यरुग्ण विभाग तसेच योगा वर्ग आदि उपक्रम राबविणे आवश्यक राहिल.
या आहेत मार्गदर्शक सूचना
- बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० आणि दुपारी ४ ते ६ अशी राहील.
- रुग्ण नोंदणी दुपारी १२.३० व सायंकाळी ६ वाजता बंद होईल.
- त्यापूर्वीच केसपेपर देण्यात आलेल्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहिल.
- प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी असल्यास दुपारची ओपीडी बंद राहिल.
- वैद्यकीय अधिकाऱ्यांना दुपारी फिरती भेट घेऊन रुग्णसेवा करणे अपेक्षित आहे.
- आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये दुपारची ओपीडी बंद राहिल.
- समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी दुपारी घरोघरी जाऊन रुग्णसेवा देणे बंधनकारक राहिल.
बाह्यरुग्ण विभागाच्या दोन्ही वेळा आधीपासूनच आहेत, मात्र अनेक ठिकाणी सायंकाळची ओपीडी बंद राहत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता वरिष्ठ स्तरावरून सायंकाळची ओपीडी सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला