परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर; वसुलीबाबत मुख्य अभियंता गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:18 PM2019-08-03T14:18:07+5:302019-08-03T14:19:17+5:30
परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर पोहोचल्याने ती वसूल करण्याचा मुद्दा मुख्य अभियंता अनिल डोये यांनी गांभीर्याने घेतला आहे.
अकोला: ग्राहकाला समाधानकारक वीज सेवा देण्याबरोबरच वितरित केलेल्या प्रत्येक युनिटच्या बिलाची सक्षमपणे वसुली होणे गरजेचे असताना वाढती थकबाकी ही महावितरणसाठी आव्हान ठरत आहे. अकोला परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर पोहोचल्याने ती वसूल करण्याचा मुद्दा मुख्य अभियंता अनिल डोये यांनी गांभीर्याने घेतला असून, वसुली व ग्राहक सेवेत निष्काळजी करणाºया बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील उपविभागीय अभियंता दहीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून थकबाकी वसुलीबाबत ‘कॅज्युअल अॅटिट्युड’ असणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. त्याचवेळी थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देशही मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत.
अकोला परिमंडळांतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्याची आढावा बैठक शुक्रवारी विद्युत भवन येथे पार पडली. या बैठकीत सविस्तर आढावा घेताना मुख्य अभियंता यांनी परिमंडळांच्या वाढत्या थकबाकीला अधिकारी व कर्मचाºयांची हलगर्जी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत वसुलीबाबत हयगय करणाºयावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.
परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण ९३ कोटी रुपये वीज देयकापोटी थकीत आहेत. थकबाकीचा हा डोंगर कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने वसुली मोहीम अधिक तीव्रपणे राबवावी, थकबाकीदारांचा वीज पुरवठा हा नियमानुसार खंडित झालाच पाहिजे, न करणाºयावर कारवाई करावी, वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केवळ वीज बिल वसुलीसाठी करण्यात येत असल्याची जाणीव ग्राहकांना करून देऊन ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याची सवय लावावी, संवेदनशील भागात वीज कर्मचाºयांनी समूहाने जाऊन थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा, अधिकारी व कर्मचाºयांनी योग्य समन्वयातून काम करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.
या बैठकीला अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, बुलडाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, वाशिम जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, प्रणाली विश्लेषक, वित्त व लेखाचे विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
८ आॅगस्टपर्यंत वसुली करा!
अकोला परिमंडळातील थकबाकीचा डोंगर वाढला असून, येत्या ८ आॅगस्टपर्यंत ही थकबाकी वसूल करण्याचे निर्देशच मुख्य अभियंता डोये यांनी या बैठकीत दिले. वसुली करतानाच ग्राहक सेवेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही डोये यांनी यावेळी केल्या. वसुलीसंदर्भात ९ आॅगस्ट रोजी आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.