पातूर : कोरोनाने ऑक्सिजनचे महत्त्व देशाला अधोरेखित केले. हीच बाब समोर ठेवून येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठा ऑक्सिजन पार्क साकारला जात आहे. तहसीलदारांनी मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व कार्यालयीन कर्मचारी यांच्या सहभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे येत्या काळात वृक्षांची ही हिरवळ कायम रहावी यासाठी येथे ‘ऑक्सिजन पार्क’ची उभारणी करण्यात करण्यात येत आहे. या जागेवर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांसह विविध शोभीवंत रोपे, औषधी गुणधर्म असणारी रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वृद्धांना बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे, लहान मुलांना खेळण्यासाठी रंगीबेरंगी विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात येणार आहे. त्याबरोबरच या ठिकाणी आणखी काही नावीन्यपूर्ण करता येईल का? याचाही विचार सुरू असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. प्रारंभी शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारचा निधी या ऑक्सिजन पार्क निर्मितीसाठी शासनाकडून प्राप्त झाला नाही. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलेली कल्पना पातूर तहसीलदारांनी कार्यालयीन कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सहभागातून प्रत्यक्षात साकारत आहे.
पार्क उभारणीमागे हा दृष्टिकोन
ग्रामीण भागातून दूरवरून येणारे नागरिक व कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी यांची होणारी दमछाक आणि कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल या सर्वांना विसावा घेता यावा, नैसर्गिक वातावरणामुळे कार्य करण्यासाठी उत्साह मिळावा, या दृष्टिकोनातून या पार्कची निर्मिती केली जात असल्याचे तहसीलदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पार्क पातूर व शिरला येथील नागरिकांना फायदेशीर
पातूर शहर व शिरला ग्रामपंचायत यांच्या सीमा वादामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उपरोक्त दोन्ही भागांचा सर्वांगीण विकास थांबला आहे. नागरिकांसाठी एकही पार्क या क्षेत्रामध्ये नाही. अशावेळी पातूर तहसीलदारांनी निर्माण कार्य सुरू केलेला ऑक्सिजन पार्क पातूर शहर व शिरला ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनाही फायदेशीर ठरू शकतो.
या पार्कला आगामी काळात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यास तहसीलदार कार्याला नक्कीच बळकटी मिळू शकेल. नुकतेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ऑक्सिजन पार्कचे निर्माण कार्य सुरू झालेले आहे आहे. लवकरच जनसेवेत हा पार्क उपलब्ध होईल.
- दीपक बाजड, तहसीलदार, पातूर