- रवी दामोदर
अकोला : ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्याची जणू परंपराच आहे. तरीही शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करतो. बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथील अल्पभूधारक शेतकरी आशीष वरखडे यांनी रात्रीचा दिवस करीत मेथीचे पीक घेतले; मात्र बाजारात आवक वाढल्याचे कारण दाखवून मेथीचे भाव गडगडले आहेत. मेथीची गड्डी केवळ ३ ते ५ रुपयांना विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. कर्जाचा डोंगर उभारून पिकाची पेरणी केली, भाव मिळत नसल्याने खर्चही निघत नाही, हे लक्षात आल्यानंतर कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यास पडला आहे.
रात्रंदिवस कष्ट करून पिकाला जपले जाते. जीवाचे रान करून पिकाचे उत्पादन घेतले जाते; पण पिकाला भाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यंदा अतिपावसामुळे परिसरातील खरीप हंगामाची नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. कर्जाचा डोंगर उभारून शेतकऱ्यांनी पुन्हा रब्बीची तयारी केली. तसेच अतिपावसामुळे कूपनलिका व विहिरांना पाणी मुबलक असल्याने शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत; मात्र शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे.
यंदा मुबलक पाणी असल्याने टाकळी खुरेशी येथील शेतकरी आशीष वारखेडे यांनी मेथीची पेरणी केली. रात्रंदिवस कष्ट करीत उत्पादन घेतले; मात्र बाजारपेठेत मेथीची आवक वाढल्याने ठोक बाजारपेठेत मेथीचा मन केवळ ५० ते ६० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. मेथीच्या ३ गड्ड्या केवळ १० रुपयांमध्ये विक्री होत शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही निघत नाही.
——————
पिकाच्या रक्षणासाठी जीवाचे रान!
परिसरात कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी रात्री स्वत:चा जीव धोक्यात घालून कुडकुडत्या थंडीत पाणी देण्यासाठी शेतात जात आहे. पिकाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करीत आहे; मात्र भाव घसरल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
----------------------------
यंदा बोअरला मुबलक पाणी असल्याने मेथीची पेरणी केली; मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने खर्चही निघत नाही.
- आशीष वरखेडे, शेतकरी, टाकळी खुरेशी, ता. बाळापूर.