पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले चित्रकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:02 PM2019-08-23T14:02:40+5:302019-08-23T14:02:57+5:30
चित्रांची विक्री आणि व्यक्तिचित्रांमधून येणारी रक्कम पूरग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणार आहे.
अकोला: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील आघाडीचे शंभर चित्रकार सरसावले आहेत. चित्रांची विक्री आणि व्यक्तिचित्रांमधून येणारी रक्कम पूरग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी दिली जाणार आहे. चित्र प्रदर्शन पुणे येथे गुरुवारपासून सुरू झाले आहे. यामध्ये अकोल्यातील चित्रकार पद्मजा पिंपळे व सतीश पिंपळे यांचा समावेश आहे. प्रदर्शन २५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.
दक्षिण महाराष्ट्रात महापुराने हाहाकार केला. राज्यासह परराज्यातील संस्था, व्यक्ती मदतीसाठी धावले. यामध्ये आता चित्रकारांनीही पुढाकार घेतला आहे. राज्यातील आघाडीचे शंभर चित्रकार या उपक्रमासाठी एकवटले. प्रदर्शनात या चित्रकारांच्या कलाकृती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. जास्तीत जास्त चित्रांची विक्री व्हावी, या उद्देशाने एक फूट बाय एक फूट आकाराच्या कलाकृतीची किंमत पाच हजार ठेवली आहे. याशिवाय प्रदर्शनस्थळी चित्रकार प्रत्यक्ष व्यक्तिचित्र रेखाटन करीत आहेत. प्रथितयश चित्रकारांकडून पाचशे रुपयांत पेन्सिल आणि चारकोल प्रकारातील व्यक्तिचित्र काढून दिले जात आहे. या उपक्रमात काही चित्रकारांनी आपल्या कलाकृती दान केल्या आहेत. चार दिवसीय या प्रदर्शनात अधिकाधिक कलाप्रेमी चित्रांची खरेदी करू न, पूरग्रस्तांसाठी मदतीचा हातभार लावत आहेत.
प्रदर्शनातून जमा होणारा निधी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी दिला जाणार आहे. पुरात अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळेतील साहित्य, पुस्तके, वह्या, संगणकांचे नुकसान झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होणार आहे. शाळांना वेळेत शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी हा मदतनिधी दिला जाणार आहे. शिवाय, पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, कपडे आदी शैक्षणिक साहित्यही पुरविले जाणार असल्याचे सतीश पिंपळे यांनी सांगितले. रोटरी क्लबचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.