- राजेश शेगोकार
अकोला -भारतीय जनता पार्टीला बहुजन चेहरा देऊन ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या नेत्यांमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. मुंडे यांनी राज्यभर मिळविलेला जनाधार हा केवळ एका समाजाच्या भरवशावर नव्हता. वंजारी समाजाचे ते एकमेव नेतृत्व होतेच, मात्र केवळ त्याच समाजापुरते न राहता त्यांनी अठरापगड जातींना जवळ केल्याने ‘लोकनेते’ ठरले. मुंडे यांचे हे मोठेपण भाजपमध्ये अनेकदा अडचणीचे ठरले व त्यामुळे त्यांना प्रत्येकवेळी संघर्षाची भूमिका जाहीरपणेसुद्धा घ्यावी लागली व आता तसाच संघर्ष त्यांची कन्या आमदार पंकजा यांना वारसाहक्काने मिळाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजांनी त्यांचा वारसा हाती घेतला, त्याचा विस्तार केला; मात्र संघर्ष काही त्यांची पाठ सोडेना. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी पूर्वी त्यांनी बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथून संघर्ष यात्रा काढली अन् भविष्यात राज्याचे नेतृत्व करायचे आहे, असे स्पष्ट संकेतच दिले. याच संकेतांमुळे पुढील पाच वर्षात सत्तेत राहूनही त्यांचा संघर्ष आणखी वाढला असून, आता हा संघर्ष नेतृत्वाच्या मुद्यावर येऊन ठेपला आहे.खरेतर गोपीनाथजी यांच्यापेक्षा पंकजांचा संघर्ष हा वेगळ्या पातळीवरचा असला तरी धग तीच आहे. समाज, पक्ष व राजकारण या तिन्ही पातळीवर पंकजांनी आपले नेतृत्व आता पणाला लावले असल्याचे चित्र परवा गोपीनाथ गडावर स्पष्ट झाले. गोपीनाथजी यांच्या नंतरची पंकजांची खरी कसोटी आता सुरू झाली, असे म्हणता येईल. आता भाजपाची सत्ता नाही, पक्षाला थेट आव्हान देत त्यांनी पक्षातील निर्णय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी उभे केलेले आव्हान हे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एकसंघ वंजारी समाजाचे नेतृत्व कोणाकडे? या प्रश्नाचाही गुंता वाढला आहे.पंकजा सध्या तरी मुंडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण तयार करीत असल्या तरी आपल्याच पक्षाच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे घेतलेली भूमिका ही केंद्रीय नेतृत्व कशा पद्धतीने हाताळते, यावरही त्यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय होणार आहे. २०१४ मध्ये बुलडाण्यातील सिंदखेड राजामध्ये संघर्ष यात्रेसाठी भरपावसात जमलेली गर्दी पंकजांचा उत्साह वाढविणारी होती. इतर कुणाच्याही भाषणाला या गर्दीने प्रतिसाद दिला नाही; पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला माईक हाती घेतल्यावरही गर्दीतून आवाज थांबत नव्हते, अखेर पंकजा उभ्या राहिल्या अन् त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर देवेंद्र यांनी तडफदार भाषण करून लोकांना जिंकून घेतले. या भाषणातून भविष्यातील या नव्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे प्रत्यंतरच उपस्थितांनी दिले. त्यांनी ही यात्रा विदर्भातून सुरू करत मराठवाड्यात नेली होती. आता २६ जानेवारीपासून मराठवाड्याच्या औरंगाबाद येथे उपोषण करून त्या आपला राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. पहिल्या संघर्ष यात्रेत नितीन गडकरींचा फोटो कुठेही नव्हता, तेव्हा त्या गर्दीतील कुणालाही ते खटकलेही नव्हते कारण बीड अन् नागपूरमधील शीतयुद्ध कोणापासून लपलेही नव्हते, यावेळी संघर्षाचा अन् नाराजीचा रोख नागपूरवरच आहे, त्यामुळे संघर्षाचे आणखी एक वर्तृळ तयार झाले आहे. फक्त या वर्तृळाचा चक्र व्यूह होऊ नये एवढेच !