- अतुल जयस्वाल अकोला - महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ४ सलग २६७ दिवसांपासून सुरू आहे. अखंडित वीज उत्पादन करीत असल्याने महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात या संचाने नवीन ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. २१० मेगावाट चंद्रपूर संच क्रमांक-३ च्या नावे या अगोदर अखंडित वीज उत्पादनाची २००९ मध्ये २६६ दिवसांच्या विक्रमाची नोंद होती. तो विक्रम मोडून पारस वीज केंद्राने आपले नाव कोरले आहे.
पारस संच क्रमांक ४ ने या २६७ दिवसांत १३८५.१ मिलियन युनिट्स आणि सरासरी २१६ मेगावॅटसह वीज उत्पादन केले आहे. पारस वीज केंद्राने नोव्हेंबर-२०२३ (९०.२२%), जानेवारी-२०२४ (९१.०२%) आणि फेब्रुवारी-२०२४ (९५.५५%) मध्ये मासिक महाराष्ट्र वीज नियामक आयोग उपलब्धता घटक वर ''''शून्य नामंजूर'''' लक्ष्य यशस्विरीत्या साध्य केले आहे, हे विशेष. पारस वीज केंद्राने २०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी-२०२४ (९३.९७%) मध्ये सर्वाधिक मासिक केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक गाठले आहे.
पारस वीज केंद्राने ऑगस्ट-२०२३ पासून मासिक विशिष्ट इंधन वापर वर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली आहे. उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र आपला नावलौकिक कायम राखत महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज आहे.-शरद भगत, मुख्य अभियंता, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, पारस