लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात बहुतांश भागात रविवारी २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. अकोल्यात खंडग्रास स्थितीत हे ग्रहण दिसणार असून, सकाळी १०.१२ वाजतापासून हा खगोलीय चमत्कार पाहावयास मिळणार आहे.जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हटले जाते. या प्रकारच्या सूर्यग्रहणामध्ये चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही, म्हणून या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात.कंकणाकृती ग्रहण हेदेखील खंडग्रास ग्रहण आहे; मात्र यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा समजला जातो. खंडग्रास स्थितीत चंद्र संपूर्णपणे सूर्यासमोर आलेला दिसत नाही. त्याचा काहीसा भाग सूर्याला झाकू शकतो.चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जाताना त्याची स्थिती काय आहे, यावरून ग्रहण कोणत्या प्रकारचे आहे, हे ठरवले जाते.अकोल्यात ग्रहणाचा प्रारंभ सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी होईल. ग्रहणाचा मध्य हा सकाळी ११ वाजून ५४ मिनिटाला असणार आहे, तर ग्रहणमोक्ष दुपारी १ वाजून ४४ मिनिटला होणार आहे. ग्रहणाचा मध्य ११.५४ वाजता असल्याने या वेळेस ग्रहण अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येणार आहे.
ग्रहण पाहताना डोळ्यांची घ्या काळजी!सूर्यग्रहण पाहताना पिनहोल कॅमेरा, टेलिस्कोप, सोलार एक्लिप्स गॉगल यांसारख्या वस्तूंचा वापर करायला हवा. लहान मुलांनी ग्रहण पाहताना पालकांचा सल्ला घ्यावा. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी डोळ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी उच्च प्रतीचे मायलर पेपर सौर चष्मे, चांगला फिल्टर ग्लास वा पीन होल कॅमेºयाचा वापर करावा. सरळ सूर्याकडे नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. सूर्याच्या किरणांनी डोळ्यांना इजा होऊ शकते. लहान मुलांनी काळजी घ्यावी. या दिवशी दिवससुद्धा मोठा राहणार आहे.- प्रभाकर दोड,खगोल अभ्यासक